जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणीवर तब्बल दहा वर्षे मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन असताना तिचे अंघोळ करतानाचे फोटो काढून आरोपीने तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या धमक्यांच्या जोरावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. पीडित तरुणी सध्या 25 वर्षांची असून, ती भोकरदन तालुक्यातील वालसावंगी परिसरातील रहिवासी आहे. 2016 मध्ये ती नववीत शिक्षण घेत असताना हा प्रकार सुरू झाला. घरात कोणी नसताना आरोपी शेख इम्रान याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढल्याचा आरोप आहे. हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची आणि शाळेत दाखवून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
या सततच्या त्रासामुळे पीडितेच्या कुटुंबाने गाव सोडून छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतर केलं. मात्र, आरोपीने तिथेही तिचा पाठलाग सुरूच ठेवला. 2018 मध्ये फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर अनेक वर्षे हा छळ सुरू राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबीयांचाही सहभाग असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिला धर्म बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आला. कुराण देऊन नमाज पठण करण्यास भाग पाडणे, बुरखा परिधान करण्याची सक्ती करणे अशा प्रकारे मानसिक छळ केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपीचे वडील, आई आणि भाऊ यांनीही या दबावात सहभाग घेतल्याचं समोर आलं आहे.
यावर्षी मार्च महिन्यात आरोपीने पुन्हा पीडितेच्या घरात घुसून मारहाण केली आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीनंतर पारध पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात ‘पोक्सो’सह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.