वयाच्या 16 व्या वर्षी आयुष्य हे स्वप्न पाहण्याचे असते. पण एका अल्पवयीन मुलीसोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जिच्यावर पहिल्यांदा अत्याचार झाला, त्यातून ती गर्भवती राहिली. ही घटना तिथेच थांबली नाही. ती गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तिच्यावर आणखी तिघांनी कारमध्ये अत्याचार केल्याचा आरोप आहे.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यस्थानमधील दौसा जिल्ह्यात ही संपूर्ण धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलेली आहे. संबंधित 16 वर्षीय गर्भवती अल्पवयीन मुलीचे तीन नराधमांनी तिचे कारमधून अपहरण केले आणि दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेव जात तिच्यावर त्यांनी आलटून-पालटून अत्याचार केले. यातच गर्भवती असलेल्या मुलीची धावत्या गाडीमध्येच प्रसूती झाली. नराधमांनी तिला अत्याचारानंतर दौसा कलेक्टरेट चौकातील रस्त्यावर सोडून पसार झाले.
रस्त्यावर सोडून दिलेल्या आणि वेदनेने कळवळेल्या पीडितेने कसाबसा तेथील एका व्यक्तीकडे मदत मागितली,ज्यानंतर तिला त्याने कोणताही वेळ वाया न घालवता दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पीडिता आपल्या नवजात बालिकेला एका कपड्यात गुंडाळून रुग्णालयात गेली. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केले.
अल्पवयीन मुलगी गर्भवती कशी?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मुलगी ही आधीपासून गर्भवती होती. साधारण फेब्रुवारी आणि मे महिन्यात तिच्यावर अजय कुमार मीणा नावाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केला होता, असा सध्या आरोप करण्यात येत आहे. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.
पोलिसांनी संबंधित पीडितेचा जबाब नोंदवून घेतला असून आरोपीविरोधात अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा ही दाखल केला आहे. फरार आरोपींना लवकारत लवकर अटक करण्यासाठी पोलिसांनी काही पथके रवाना केली आहेत.