अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तब्बल 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील काही मुलींची प्रसूती देखील झाल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा गरोदर व स्तनदा मातांचे सर्वेक्षण केले जाते.
यादरम्यान ही भयंकर आकडेवारी समोर आली. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या ‘मातृत्व वंदना योजने’चा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जांमध्येही या अल्पवयीन मुलींची नावे आढळल्याने प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कायदेशीर कारवाईच्या धाकामुळे अनेक बालविवाहांची नोंदच होत नाही. मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने अनेक पालक अल्पवयातच मुलींचे लग्न लावून देत आहेत.
त्यामुळे प्रत्यक्षातील गरोदर अल्पवयीन मुलींची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरीय बाल संरक्षण समित्या सक्रिय करणे, लग्नाच्या वेळी वधू-वरांचे जन्मदाखले सक्तीचे करणे आणि अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अकोले येथील बालसंरक्षण समितीचे अशासकीय सदस्य श्रीनिवास रेणुकादास यांनी केली आहे.