Ketan Agarwal Case: लोणावळ्यातील लोहगडावरून दरीत ढकलून करण्यात आलेल्या तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलिसांच्या कसून चौकशीदरम्यान मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने गुन्ह्याची कबुली देत हत्येमागचे खरे कारण पोलिसांसमोर घडाघडा बोलून दाखवले आहे. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेल्या केतनसोबत सियाचे लग्न ठरले होते आणि दोन्ही कुटुंबात लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, सियाचे आधीपासूनच चेतन चौधरी नावाच्या तरुणावर प्रेम होते. त्यामुळे केतनसोबत लग्न करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. केतनचे व्यक्तिमत्त्व तिला कधीच आवडले नव्हते आणि त्याच्या दोन गोष्टी तिला प्रचंड खटकायच्या, अशी कबुली तिने पोलिसांना दिली आहे.
'विग' वापरणे आणि बोलताना अडखळणे; केतनच्या उणिवांमुळे सियाचा लग्नाला होता विरोध
पोलिसांनी घेतलेल्या चौकशीत सियाने सांगितले की, केतनला टक्कल होते आणि तो केसांचा टोप (विग) वापरायचा, ही गोष्ट सर्वसामान्यांना माहीत नव्हती. याशिवाय बोलताना तो काहीसा अडखळायचा. लग्न ठरवताना गोयल कुटुंबाला या गोष्टी ठाऊक होत्या आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते; परंतु सियाला मात्र केतनच्या या दोन्ही उणिवांमुळे त्याचा प्रचंड तिरस्कार वाटत होता. मनातून पूर्णपणे नकार असतानाही केवळ कौटुंबिक दबावामुळे ती या नात्यात अडकली होती. मात्र, मनात चेतनबद्दलचे प्रेम आणि केतनबद्दलचा राग असल्याने तिने केतनला कायमचे संपवण्याचा क्रूर कट प्रियकरासोबत मिळून रचला.
लग्नाला नकार देण्याऐवजी गुन्हेगारी मार्ग का निवडला? सियाने सांगितले कारण…
"केतनशी लग्न करायचे नव्हते तर घरच्यांना सांगून लग्न का मोडले नाहीस?" या पोलिसांच्या थेट प्रश्नावर सियाने उत्तर दिले. तिने सांगितले की, "मला माझ्या आई-वडिलांना दुखवायचे नव्हते. ऐनवेळी लग्न मोडले असते तर समाजातील आमच्या कुटुंबाची इभ्रत आणि प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्यामुळे लग्न मोडण्यापेक्षा केतनलाच कायमचे मार्गातून हटवणे मला सर्वात सोपा आणि सुरक्षित उपाय वाटला." लोहगडावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने, ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून केतनचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव सहज यशस्वी होईल, अशी तिची धारणा होती.
गोयल कुटुंबीयांनी फिरवली पाठ; भावाची चौकशी सुरू, वडील रुग्णालयात
या अंगावर काटा आणणाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाल्यानंतर सियाच्या स्वतःच्या कुटुंबानेही तिच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. अटकेत असलेल्या सियाला भेटण्यासाठी तिच्या घरातील एकही सदस्य पोलीस ठाण्यात आलेला नाही. या धक्क्यामुळे तिचे वडील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुसरीकडे, लोणावळा पोलिसांनी या कटात कुटुंबातील इतर कोणाचा हात आहे का, हे तपासण्यासाठी सियाचा भाऊ साहिल गोयल याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण केले असून, सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.