Digital Arrest Scam: सायबर गुन्हेगारांनी दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात एका वृद्ध डॉक्टर दाम्पत्याला 'डिजिटल अटक' करून 15 कोटी रुपयांना लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डॉ. ओम तनेजा आणि डॉ. इंदिरा तनेजा हे दाम्पत्य, जे अनेक वर्षे अमेरिकेत संयुक्त राष्ट्रांसाठी (UN) कार्यरत होते. 2016 मध्ये भारतात परतले होते. मात्र, सायबर भामट्यांनी रचलेल्या एका जाळ्यात अडकून त्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी अवघ्या 15 दिवसांत गमावली. या घटनेचे सर्वात भयावह वैशिष्ट्य म्हणजे गुन्हेगारांनी चक्क बनावट न्यायालय आणि बनावट न्यायाधीशाचा वापर करून या जोडप्याला धमकावले.
असा रचला अटकेचा बनाव
या फसवणुकीची सुरुवात 24 डिसेंबर 2025 रोजी एका फोन कॉलने झाली. स्वतःला पोलीस अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीने डॉ. तनेजा यांच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंग आणि ड्रग्ज तस्करी होत असल्याचा खोटा आरोप केला. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे पोलिसांच्या गणवेशातील गुन्हेगार समोर आले, ज्यांच्या पार्श्वभूमीला दिल्ली पोलिसांचा लोगो होता. त्यांनी या दाम्पत्याला 'डिजिटल अटक' जाहीर केली आणि घराबाहेर पडण्यास किंवा कोणाशीही बोलण्यास सक्त मनाई केली. त्यांना 24 तास व्हिडिओ देखरेखीखाली (Surveillance) ठेवून मानसिक गुलाम बनवण्यात आले.
बनावट सुप्रीम कोर्टाचा वापर
जेव्हा डॉ. तनेजा यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गुन्हेगारांनी त्यांना एका बनावट न्यायाधीशासमोर व्हिडिओ कॉलवर हजर केले. तिथे काळे कोट घातलेले लोक आणि न्यायालयासारखा सेटअप पाहून हे दाम्पत्य घाबरले. "हा खटला थेट सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे, स्थानिक पोलीस यात काहीही करू शकत नाहीत," अशी धमकी बनावट न्यायाधीशाने दिली. तपास शुल्क, जामीन आणि न्यायालयीन पडताळणीच्या नावाखाली 21 डिसेंबर ते 9 जानेवारी या काळात गुन्हेगारांनी 14.85 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले.
पोलीस तपास
गुन्हेगारांनी पाठवलेली अटक मेमो, कोर्टाचे आदेश आणि बँक नोटीस ही सर्व कागदपत्रे बनावट होती, परंतु ती अत्यंत व्यावसायिकरीत्या तयार करण्यात आली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल सायबर युनिटकडे धाव घेतली. सध्या पोलीस बँक व्यवहार, आयपी पत्ते आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे या आंतरराज्य टोळीचा शोध घेत आहेत.