जालना: नवरदेवाच्या करवलीची दिशाभूल करून 20 ते 25 तोळे सोनं लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 8 जून रोजी जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखानाजवळ असलेल्या गोदावरी मंगल कार्यालयात घडली आहे. बळेगाव येथील अनिरुद्ध झिंजुर्डे आणि मातोरी येथील डॉ. विजयकुमार जरंगे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यादरम्यान, कलोरी गावातील महिला चोरट्यांनी नवरदेवाच्या करवलीच्या पर्सवर डोळा ठेवला होता.
चोरीचा मामला:
जेवणासाठी बसलेल्या नवरदेवाच्या बहीणीच्या पर्समध्ये तब्बल 20 ते 25 तोळे सोनं, 60 हजार रुपये, एक सॅमसंग मोबाईल आणि एक आयफोन होते. अत्यंत हुशारीने या महिलांनी नवरदेवाच्या बहीणीची दिशाभूल करून तिचा पर्स लंपास केला. मात्र, जेव्हा केटरर्सनी या महिलांना चोरी करताना पकडले, तेव्हा या महिलांनी त्यांना धमकावून नवरदेवाच्या बहीणीचा पर्स घेऊन पळ काढला.
आयफोनमुळे चोरट्यांचे लोकेशन ट्रॅक करण्यात यश:
पर्समधील सॅमसंग मोबाईल बंद करण्यात आला, पण आयफोन बंद करता आला नाही. याचा फायदा घेत बळेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे यांनी आयफोनचे लोकेशन ट्रॅक केले. वाडीगोद्री येथील ठिकाण समजताच, गावकऱ्यांनी तिथे धाव घेतली. महिला चोर अंगावर येऊन प्रतिकार करू लागल्याने गावकरी मागे हटले. गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.