Jayant Chaudhary Death Threat: भारताचे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे (RLD) प्रमुख जयंत चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 18 मार्च 2026 रोजी सकाळी एका अज्ञात क्रमांकावरून आलेल्या फोन कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी जयंत चौधरी यांच्या कार्यालयाकडून दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारीनुसार, 18 मार्च रोजी सकाळी 11:00 च्या सुमारास जयंत चौधरी यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने थेट धमकावण्यास सुरुवात केली. त्याने मंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्याचा कार्यक्रम व्हॉट्सॲपवर पाठवून त्यावर 'Shoot him' (त्याला गोळ्या घाला) असे शब्द लिहिले होते. विशेष म्हणजे, आरोपीने केवळ धमकी देऊन न थांबता त्याचे 'लाईव्ह लोकेशन' आणि अनेक 'व्हॉइस मेसेजेस' देखील पाठवले आहेत, ज्यामध्ये सातत्याने हत्येचा उल्लेख करण्यात आला आहे.
MP5 शस्त्राचा उल्लेख आणि 'वरच्या स्तरावरून' आदेश
धमकी देणाऱ्या व्यक्तीने MP5 सारख्या अत्याधुनिक शस्त्राचा उल्लेख करत जयंत चौधरी यांची हत्या करण्याचा दावा केला आहे. जेव्हा मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संबंधित क्रमांकावर पुन्हा फोन करून विचारणा केली की, "तुम्हाला मंत्र्यांचा अधिकृत दौरा कसा मिळाला?", तेव्हा आरोपीने हा कार्यक्रम आपल्याला 'वरच्या स्तरावरून' (From Above) पाठवण्यात आल्याचे धक्कादायक उत्तर दिले. या उत्तरामुळे या कटामागे एखादे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवास्थानाबाहेर संशयास्पद हालचाली
या धमकीनंतर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. जयंत चौधरी यांच्या निवासस्थानाच्या मागील दरवाजावर गेल्या काही दिवसांपासून एक अज्ञात व्यक्ती पाळत ठेवून असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, साधारण तीन दिवसांपूर्वी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान, काळ्या काचा असलेली एक पांढऱ्या रंगाची 'स्विफ्ट' कार मुख्य प्रवेशद्वाराजवळ बराच वेळ उभी होती. या गाडीतील व्यक्ती संशयास्पद रितीने परिसराची टेहळणी करत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तपास सुरू
घटनेचे गांभीर्य ओळखून तुघलक रोड पोलिसांनी सर्व पुरावे ताब्यात घेतले आहेत. संशयित क्रमांक आणि त्यावरून आलेले मेसेजेस तांत्रिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.