संतोष खटाळ. प्रतिनिधी. मालेगाव: मालेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुऱ्हाडीच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर, मृतदेह तब्बल 2 महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन करून ठेवलेला होता. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर जवळच्या मालगोंदा येथे घडला असून, उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
यशवंत मोहन ठाकरे हा मृत पतीचा नाव आहे. पोलिसांनी संशयित पत्नी प्रभा यशवंत ठाकरे याला अटक केली आहे. तिने पतीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून गुन्हा अधिक गूढ बनला आहे. 14 एप्रिल 2025 पासून यशवंत घरातून बेपत्ता होता. 2 महिने उलटूनही तो घरी परतला नसल्याने, आई-वडिलांनी पत्नी प्रभाकडे विचारणा केली असता, प्रभाने यशवंत गुजरातमधील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेला असल्याचे सांगितले.
हेही वाचा: Chhtrapati Sambhajinagar: 17 जून रोजी आपेगाव दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान
मुलगा घरी न आल्याने आई-वडिलांची चिंता वाढली. पुन्हा विचारपूस केल्यावर प्रभाने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रभा आपल्या पतीचा शोध घेत नसल्यामुळे कुटुंबियांना तिच्यावर संशय आला. घराच्या मागच्या बाजूला खड्डा खणल्यावर त्यात शेण आणि माती असल्याचे आई-वडिलांना दिसले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी प्रभाला बिलीमोरा येथून चौकशीसाठी आणले. महसूल विभागाच्या सहकार्याने घराच्या ओसरीवर खड्डा खोदला, मात्र प्रेत सापडले नाही. प्रभा या आरोपांना नाकारत होती.
2 दिवसांनी यशवंतचा धाकटा भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी गेली. तिथे दारावर पडलेली यशवंतची चपल प्रभाने मांडीखाली लपवलेली होती. मेथूने ही बाब पतीला सांगितली. उत्तमने घराच्या दक्षिण दिशेला असलेल्या शौचालयाच्या शोषखड्ड्याजवळ कुजलेला वास आणि माश्या फिरताना पाहिल्या. खड्डा खोदल्यावर मृतदेह आढळला. तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी प्रभाला ताब्यात घेतले. खाकी दाखवल्यावर प्रभाने कबूल केले की, तिने कुऱ्हाडीने पतीची हत्या केली आणि त्याचे शरीर तुकडे करून शोषखड्ड्यात दफन केले. वास येऊ नये म्हणून औषधेही टाकली. मृत यशवंतच्या मागे मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे.