Toxic Event Accident: दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार यश याच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' या चित्रपटाचा भव्य प्री-रिलीज सोहळा हैदराबाद येथील मल्ला रेड्डी विद्यापीठाच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात पार पडत होता. या कार्यक्रमासाठी हजारो चाहत्यांची अलोट गर्दी जमली होती. मात्र, अचानक साऊंड सिस्टमची अवजड रचना कोसळल्याने कार्यक्रमाच्या उत्साहावर विरजण पडले आणि या दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले.
गर्दी अनियंत्रित; संरचनेवर चढणे पडले महाग
कार्यक्रमादरम्यान गर्दीला आवरण्यासाठी पोलीस आणि सुरक्षारक्षक वारंवार आवाहन करत होते. तरीही चाहत्यांचा उत्साह अनावर झाल्याने अनेकांनी मंचाच्या दिशेने धाव घेतली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, काही तरुण सुरक्षेचे नियम डावलून कार्यक्रम स्थळावरील विविध लोखंडी खांबांवर आणि संरचनेवर चढू लागले. साऊंड आणि लाईटिंग सिस्टमला आधार देणाऱ्या खांबांवर अतिरिक्त भार पडल्याने तो अचानक खाली कोसळला, ज्यामुळे परिसरात एकच घबराट आणि धावपळ उडाली.
संवेदनशील यशकडून तत्काळ भाषण स्थगित; मदतीसाठी धाव
दुर्घटना घडली तेव्हा अभिनेता यश मंचावरून उपस्थितांना संबोधित करत होता. साऊंड ट्रस कोसळताच लाईट्स आणि ऑडिओ यंत्रणा बंद पडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यशने तात्काळ आपले भाषण थांबवले आणि उपस्थितांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. "काळजी घ्या, तिथे सर्व ठीक आहे ना? सगळे सुरक्षित आहेत का?" अशी विचारपूस करत त्याने मंचावरूनच प्रशासकीय अधिकाऱ्यांना जखमींच्या मदतीसाठी तातडीने पुढे जाण्याचे निर्देश दिले.
जखमींवर उपचार सुरू; कार्यक्रमानंतर सोहळा पूर्ण
अभिनेत्याच्या सूचनेनंतर आयोजक आणि सुरक्षा यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना वैद्यकीय मदत मिळून परिस्थिती नियंत्रणात आल्याची खात्री झाल्यानंतरच यशने आपले उर्वरित भाषण पूर्ण केले.
26 ऑगस्टला चित्रपटगृहांत धडकणार 'टॉक्सिक'
गीतू मोहनदास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'टॉक्सिक' हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात यशसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसणार असून, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.