Ranveer Singh : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'कांतारा' चित्रपटाशी संबंधित धार्मिक परंपरेची खिल्ली उडवल्याच्या आरोपावरून बंगळुरूच्या हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात रणवीर सिंगविरुद्ध फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गोव्यातील एका कार्यक्रमात हिंदू देवतांचा अपमान केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
नेमकी तक्रार काय ?
बंगळुरूचे वकील प्रशांत मेथल यांनी याप्रकरणी न्यायालयात खाजगी तक्रार दाखल केली होती. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACJM) न्यायालयाने बुधवारी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी पावले उचलली आहेत. भारतीय दंड संहिता (IPC) 2023 च्या कलम 196, 299 आणि 302 अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, रणवीरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.
काय आहे 'कांतारा' आणि 'दैव' वादाचे प्रकरण?
तक्रारीनुसार, ही घटना 28 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यात पार पडलेल्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या' (IFFI) समारोप समारंभात घडली. स्टेजवर 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीच्या उपस्थितीत रणवीर सिंगने किनारी कर्नाटकातील पवित्र 'भूत कोला' परंपरेचे अनुकरण केले. रणवीरने पांजुर्ली आणि गुलिगा या देवतांशी संबंधित हावभाव अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद पद्धतीने सादर केल्याचा आरोप आहे. रणवीरने आदरणीय संरक्षक देवता असलेल्या 'चावूंडी दैव' यांचा उल्लेख चक्क "स्त्री भूत" (Female Ghost) असा केला. तक्रारदार मेथल यांनी म्हटले की, चावूंडी दैव हे त्यांचे कौटुंबिक दैवत असून अशा वक्तव्याने भक्तांच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत.
हेही वाचा - Ajit Pawar Death: 'महाराष्ट्राचा आधार हरपला...'; अजितदादांच्या निधनाने कलाविश्व हळहळले, संकर्षण कऱ्हाडे आणि वंदना गुप्तेंनी शेअर केल्या आठवणी
व्हिडिओ व्हायरल आणि ऋषभ शेट्टीची प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रणवीर सिंग ऋषभ शेट्टीला म्हणताना दिसत आहे की, "जेव्हा ते मादी भूत तुमच्या शरीरात शिरते, तेव्हा तो शॉट उत्कृष्ट होता." यावर कळस म्हणजे, रणवीरने त्या पात्राची नक्कल करण्यास सुरुवात केली. यावेळी ऋषभ शेट्टी त्याला वारंवार हातवारे करून थांबवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र रणवीरने ते सुरूच ठेवल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
न्यायालयाची भूमिका आणि पुढील सुनावणी
तक्रारदाराच्या मते, एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सेलिब्रिटीने जाणीवपूर्वक असे कृत्य करणे हे सामाजिक सलोखा बिघडवणारे आहे. हा खटला आता प्रथम अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (CMM) न्यायालयात वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, बेंगळुरू पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून रणवीर सिंगला चौकशीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.