MSRTC Brand Ambassador: महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) आता आधुनिक ब्रँडिंगच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. एसटीची प्रतिमा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आणि तरुणांना या प्रवासाकडे आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची अधिकृत ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पाच वर्षांचा मास्टर प्लॅन: ‘सोशल’ जाहिरातींवर भर
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत येत्या दोन दिवसांत या स्टार जोडीसोबत औपचारिक करार संपन्न होणार आहे. हा करार पुढील 5 वर्षांसाठी असेल. रितेश आणि जिनिलिया केवळ टीव्ही जाहिरातींपुरते मर्यादित न राहता, सोशल मीडिया कॅम्पेन आणि विविध प्रवासी जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधतील. खेड्यापाड्यातील ‘लालपरी’ आता शहरांतील हायटेक प्रवाशांच्या पसंतीस उतरावी, असा महामंडळाचा मानस आहे.
दिग्गजांचा वारसा आता नव्या जोडीकडे
एसटीच्या जाहिरातींचा इतिहास अत्यंत समृद्ध राहिला आहे. यापूर्वी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपल्या गावरान शैलीतून एसटीला घराघरात पोहोचवले होते. दिवंगत विक्रम गोखले यांनीही एसटीची विश्वासार्हता वाढवण्यासाठी योगदान दिले होते. आता याच परंपरेत रितेश-जिनिलियाच्या आधुनिकतेची जोड मिळणार असून महामंडळ एका ‘न्यू लूक’मध्ये प्रेक्षकांसमोर येईल.
‘राजा शिवाजी’ आणि राहिलचे पदार्पण
एसटीच्या ब्रँडिंगसोबतच देशमुख कुटुंबासाठी वैयक्तिक पातळीवरही हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. रितेश देशमुख यांच्या बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या भव्य चित्रपटातून त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुख मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटात स्वतः रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या तर जिनिलिया महाराणी सईबाईंच्या ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शनही रितेशनेच केल्यामुळे आणि आता राहिलची एन्ट्री झाल्यामुळे या ऐतिहासिक सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.