Santosh Juvekar: ‘संत्या, आता तरी बघ की रे’ अक्षय खन्नाच्या व्हायरल सीनवरून नेटकऱ्यांनी पुन्हा संतोष जुवेकरला धरलं वेठीस

धुरंधरमधील अक्षय खन्नाचा सीन व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संतोष जुवेकरच्या जुन्या वक्तव्याची पुन्हा आठवण काढत ट्रोलिंगला सुरुवात केली असून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

Santosh Juvekar: ‘संत्या, आता तरी बघ की रे’ अक्षय खन्नाच्या व्हायरल सीनवरून नेटकऱ्यांनी पुन्हा संतोष जुवेकरला धरलं वेठीस

Santosh Juvekar: अभिनेता अक्षय खन्नाच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील सीन्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठमोळा कलाकार संतोष जुवेकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी ‘छावा’च्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका वक्तव्यामुळे संतोषवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली होती. आता अक्षयचे व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून अनेकांनी त्या जुन्या प्रकरणाची आठवण काढली आहे.

‘छावा’ चित्रपटात संतोषने रायाजींची भूमिका केलेली. एका मुलाखतीत तो सेटवरील अनुभव सांगत होता. त्यावेळी त्याने मुघलांच्या भूमिका करणाऱ्या कलाकारांशी जास्त संवाद झाला नसल्याचं सांगितलं होतं. विशेष म्हणजे, औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाशी तो कधीच बोलला नाही, असं तो सहजपणे म्हणाला होता. “मी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या जवळ अक्षय खन्ना बसला होता पण मी त्याच्याकडे पाहिलंच नाही,” असं त्याने म्हटल्याचं व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत होतं. हे वक्तव्य काहींना खटकले आणि त्याला ट्रोलिंगचा जोरदार सामना करावा लागला.

त्या वेळेस अनेकांनी संतोषवर टीका करताना त्याने अक्षयचा अपमान केल्याचं म्हटलं होतं. स्वतः संतोषने मात्र त्याचा गैरसमज झाला असल्याचं सांगून स्पष्टीकरण दिलं होतं. अक्षय हा स्वतःलाही आवडणारा कलाकार असल्याचंही त्याने सांगितलं होतं. पण प्रेक्षकांचा भाग वेगळा होता. काहींना संतोषचं वक्तव्य टोचलं आणि त्या प्रकरणावरून सोशल मीडियावर मोठी चर्चाही रंगली.

दरम्यान, आता ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचा एक खास सीन इंटरनेटवर चांगलाच वायरल होत आहे. एका अरबी गाण्यावर त्याचा हटके डान्स, त्याची बॉडी लँग्वेज आणि त्याची क्लासिक स्टाईल यामुळे हा सीन अचानक चर्चेत आला आहे. या व्हायरल सीनसोबत अनेकांनी संतोष जुवेकरचा उल्लेख करत जुन्या मीम्स पुन्हा शेअर करायला सुरुवात केली आहे.

काहींनी मजेत संतोषला उद्देशून “आता तरी पाह ना संत्या” असे लिहिले आहे. तर “अक्षय हिट झाला की लोकांना संत्या आठवणारच” असंही एकानं म्हटलं. काहींनी “तू जोपर्यंत नको म्हणशील, तोपर्यंत तो सुपरहिट होत राहणार” असा टोमणा मारला आहे. दुसरीकडे, संतोषच्या “मी बघितलाच नाही” या जुन्या वक्तव्यावरही भरपूर कमेंट्स होत आहेत.

अक्षय खन्नाचा ‘धुरंधर’मधील सीन प्रेक्षकांना इतका आवडतोय की, त्याच्या अभिनयाला पुन्हा एकदा हिटचा मुहूर्त लागल्याचं बोललं जात आहे. त्याचवेळी संतोषच्या जुन्या वक्तव्यामुळे तयार झालेला विनोदी माहोल पुन्हा एकदा जोमात आहे. सोशल मीडिया वापरकर्ते या दोघांच्या संदर्भातील मीम्स, फनी कमेंट्स आणि जुन्या चर्चांना नव्याने उजाळा देत आहेत.

संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं तर, हा वाद आता फक्त मजेशीर ट्रोलिंगपर्यंत येऊन थांबला आहे. अक्षयचे व्हायरल सीन्स, संतोषचा उल्लेख आणि नेटकऱ्यांची खेळकर भाषा या सगळ्यामुळे या दोघांच्या नावांची पुन्हा एकदा सोशल मीडियावर गाजावाजा होत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number