महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी त्यांचे नवीन भजन स्वरूपातील गाणे श्रोत्यांच्या भेटीला आणले आहे. “कोई बोले राम राम” या शीर्षकाचे हे आध्यात्मिक गीत गुरू नानक देवजींच्या संदेशाने प्रेरित असून, श्रद्धेतील विश्वास आणि अध्यात्मिक प्रेम यावर भर देणारे आहे.
अमृता फडणवीस यांनी हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले असून, एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत त्या म्हणाल्या, मी स्वतः शब्दबद्ध केलेले ‘कोई बोले राम राम…’ सादर करताना अभिमान वाटतो. गुरू नानक देवजींनी दिलेला संदेश आहे की आपण कोणालाही राम, हरि किंवा अल्लाह म्हटलं, तरी परमसत्य एकच असतं. संगीत आणि प्रार्थनेतून आपण भेद दूर करून शांतता, प्रेम आणि एकात्मतेचा मार्ग शोधतो.”
या गाण्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांनी त्यातील संदेश, शांत करणारी धून आणि सादरीकरणाचे कौतुक केले आहे. अनेकांनी अध्यात्मिक एकात्मता जपल्याबद्दल अमृता फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
अमृता फडणवीस यांच्या प्रत्येक वेळेस नव्या शैलीत आणि संकल्पनेतून सादर होणाऱ्या त्यांच्या प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पहात असतात. त्यांच्या या नव्या गाण्यामुळे त्यांची आध्यात्मिक गायिका म्हणूनची ओळख अधिक बळकट होत असल्याचे चाहत्यांचे मत आहे. सोशल मीडियावर त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
हे गाणे विविध संगीत प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून, येत्या काही दिवसांत गाण्याची पोहोच आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Tejaswini Lonari Engagement: शिवसेना नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत या मराठी अभिनेत्रीचा साखरपुडा