Tuesday, November 11, 2025 09:55:04 PM

Chhaya Kadam : आयफा हुकला, पण फिल्मफेअर जिंकलाच! छाया कदम 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'; माधुरी दीक्षितला मागे टाकत पटकावला मानाचा पुरस्कार

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात छाया कदम यांनी 'लापता लेडीज' या सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा पुरस्कार पटकावला.

chhaya kadam  आयफा हुकला पण फिल्मफेअर जिंकलाच छाया कदम  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री माधुरी दीक्षितला मागे टाकत पटकावला मानाचा पुरस्कार

70th filmfare awards Chhaya Kadam won Best Supporting Actress: मराठी आणि आता हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांच्यासाठी गेली दोन वर्षे खूपच खास ठरली आहेत. त्यांच्या सिनेमांना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार (International Awards) आणि इतर मोठ्या सन्मानांमुळे त्या सध्या यशाचा आनंद घेत आहेत. आता या पुरस्कारांच्या यादीत सिनेइंडस्ट्रीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्काराचीही (Filmfare Award) भर पडली आहे.

'लापता लेडीज'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात छाया कदम यांनी 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा (Best Supporting Actress) पुरस्कार पटकावला. बॉलिवूडच्या दिग्गज आणि बड्या स्टार्स मंडळींच्या गर्दीत आपल्या मराठमोळ्या छाया कदम यांनी मोठी छाप पाडली.

माधुरीला मागे टाकले
विशेष म्हणजे, 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'साठी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितलाही (Madhuri Dixit) नामांकन होते. तिला मागे टाकत छाया कदम यांनी या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
मंजूची भूमिका: किरण रावने (Kiran Rao) दिग्दर्शित केलेल्या 'लापता लेडीज' या सिनेमात छाया कदम यांनी मंजूची भूमिका साकारली होती. हा सिनेमा दोन नवविवाहित वधूंच्या (Fullkumari - नितांशी गोयल आणि Pushpa - प्रतिभा रत्ना) अवतीभोवती फिरतो, ज्या रेल्वे प्रवासात अचानक गायब होतात आणि त्यानंतर काय गोंधळ होतो, याची ही कथा आहे.

हेही वाचा - Abhishek Bachchan: अभिषेकला मिळाला बेस्ट एक्टर फिल्मफेअर अवॉर्ड, सोहळ्यात पत्नी ऐश्वर्याच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण

कौतुकाचा वर्षाव आणि भावूक क्षण
पुरस्कार स्वीकारल्यानंतर छाया कदम फिल्मफेअरच्या मंचावर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी हिंदी, मराठी आणि मालवणी भाषेत अगदी मनापासून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांचा हा व्हिडिओ देखील चांगलाच चर्चेत आला आहे.
दरम्यान, आयफा (IIFA) पुरस्कार हुकल्यानंतर छाया कदम यांचे चाहते नाराज होते. पण आता फिल्मफेअर पुरस्कार जाहीर होताच, त्यांच्या सेलिब्रिटी मित्र-मंडळी आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या छाया यांचा प्रवास
छाया कदम यांचा प्रवास खूप मोठा आणि प्रेरणादायी आहे. मुंबईतील कलिना येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या छाया यांचे वडील गिरणी कामगार होते. बारावीत एकदा अनुत्तीर्ण झाल्यावरही न खचता त्यांनी टेक्सटाइल डिझाइनची पदवी मिळवली. त्या राज्यस्तरावर कबड्डीही खेळायच्या.
अभिनयाची आवड आणि चित्रपटांमधील यश : शाळा-महाविद्यालयात नाटकांमध्ये भूमिका करणाऱ्या छाया यांनी पुढे अभिनय क्षेत्रातच करियर निवडले. त्यांनी वामन केंद्रे यांच्या 'झुलवा' नाटकासह 'फाट्याचं पाणी', 'विठ्ठल' आणि 'दगडांचा देव' अशा लघुपटांमध्येही भूमिका साकारल्या.
पुढे त्यांना चित्रपटात संधी मिळाली. 'फँड्री', 'सैराट' यांसह 'झुंड' या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. गेल्या दोन ते तीन वर्षांत त्यांच्या वाट्याला यश आले असले तरी, इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास मोठा होता.

हेही वाचा - Mana Che Shlok: मृण्मयी देशपांडेचा मोठा निर्णय! ‘मना’चे श्लोक’ नव्या नावासह 'या' तारखेला पुन्हा प्रदर्शित होणार


सम्बन्धित सामग्री