Tuesday, February 17, 2026 06:10:57 PM

Javed Akhtar : जावेद अख्तर यांचा Border-2 साठी गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार! सुनावले खडे बोल

आजकाल मार्केटिंगच्या नावाखाली जुन्या गाण्यांची मोडतोड करून ती पुन्हा बाजारात आणली जातात, यावर अख्तर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

javed akhtar  जावेद अख्तर यांचा border-2 साठी गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार सुनावले खडे बोल

Javed Akhtar Refuses to Write Songs for Border-2 : बॉलिवूडचा अजरामर युद्धपट 'बॉर्डर'चा सिक्वेल तब्बल 28 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या मूळ यशात सिंहाचा वाटा उचलणारे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी 'बॉर्डर-2' साठी गाणी लिहिण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना चित्रपट निर्मात्यांवर तिखट शब्दांत टीका केली. जुन्या लोकप्रिय गाण्यांमध्ये किरकोळ बदल करून ती पुन्हा सादर करणे, हे सर्जनशील क्षेत्रातील 'दिवाळखोरी' असल्याचे सांगत त्यांनी या प्रकल्पात सहभागी होण्यास नकार दिला.

'हकीकत'चे उदाहरण देत निर्मात्यांना टोला
जावेद अख्तर यांनी यावेळी जुन्या काळातील 'हकीकत' चित्रपटाचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, "आमच्यासमोर 'हकीकत' सारखा महान चित्रपट होता. त्यातील ‘कर चले हम फिदा’ आणि ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था’ ही गाणी अफलातून होती. असे असतानाही आम्ही 'बॉर्डर'साठी पूर्णपणे नवीन गाणी लिहिली होती. भूतकाळातील वैभवावर जगण्यापेक्षा काहीतरी नवीन निर्माण करणे गरजेचे असते." निर्मात्यांनी त्यांना 'बॉर्डर-2' साठी पुन्हा गाणी लिहिण्याची ऑफर दिली होती; परंतु, रिमेक संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांनी या ऑफरला नाकारले.

रिमेक संस्कृतीवर ओढले ताशेरे
आजकाल मार्केटिंगच्या नावाखाली जुन्या गाण्यांची मोडतोड करून ती पुन्हा बाजारात आणली जातात, यावर अख्तरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "जर तुम्ही पुन्हा नवा चित्रपट बनवत असाल, तर त्यामध्ये नवीन गाणी देण्याची हिंमत दाखवा. जुन्या गाण्यांचा रिमेक करणे म्हणजे आपण आता त्या दर्जाचे काम करू शकत नाही, हे मान्य करण्यासारखे आहे," असा टोला त्यांनी लगावला. गाणी पुन्हा जुन्या चालीवर बांधून केवळ प्रेक्षकांच्या भावनांशी खेळणे त्यांना योग्य वाटले नाही.

हेही वाचा - AI Project 'Bal Tanhaji' : चित्रपटाचा प्रीक्वल AI मध्ये; अजय देवगण घेऊन येत आहेत 'बाल तान्हाजी'!

अरिजीत आणि दिलजीतच्या आवाजात 'संदेशे आते है'
जावेद अख्तर यांनी नकार दिल्यानंतर, 'बॉर्डर-2' मध्ये मूळ गाणे 'घर कब आओगे' (संदेशे आते है) नव्या रूपात सादर करण्यात आले आहे. या गाण्यासाठी निर्मात्यांनी अरिजीत सिंग, विशाल मिश्रा, दिलजीत दोसांज आणि सोनू निगम या दिग्गज गायकांची मदत घेतली आहे. विशेष म्हणजे मूळ गाणे जावेद अख्तर यांनीच लिहिले होते आणि अनु मलिक यांनी ते संगीतबद्ध केले होते. मात्र, रिमेकच्या प्रक्रियेत मूळ लेखकानेच पाठ फिरवल्याने चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

23 जानेवारीला चित्रपट होणार प्रदर्शित
अनुराग सिंग दिग्दर्शित 'बॉर्डर-2' हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गुलशन कुमार आणि टी-सीरिज यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. मात्र, जावेद अख्तर यांच्या अनुपस्थितीमुळे चित्रपटाच्या संगीतावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा - Akshay Kumar Car Accident: जुहूमध्ये मध्यरात्री थरार! अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षा चालकाची प्रकृती...


सम्बन्धित सामग्री