मुंबई: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ नृत्यांगणा आणि अभिनेत्री मधुमती यांनी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. याआधी नुकतंच बीआर चोप्रांच्या महाभारतात कर्ण साकारलेल्या पंकज धीर यांचंही निधन झालं. अशातच आता चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे.
मराठी चित्रपटांपासून केली कारकीर्दीची सुरुवात
मधुमती यांचा जन्म 1938 मध्ये महाराष्ट्रातील एका गावात झाला. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भोजपुरी, पंजाबी, मराठी, दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. त्यांची डान्स करण्याची पद्धत पडद्यावर इतकी हिट ठरली की, त्यांची तुलना त्या काळातली प्रसिद्ध अभिनेत्री हेलेनशी केली गेली. डान्सर मधुमती यांनी तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटापासून केली. तिनं तिच्या पतीसोबत अनेक वर्ष अजिंठा कला मंडळात काम केलं, जे भारतीय सैन्यासाठी कार्यक्रम सादर करायचे.
वयाच्या 19व्या वर्षी केलं लग्न
मधुमती यांनी वयाच्या 19व्या वर्षी लग्न केले आणि 1977 मध्ये डान्स करणं सोडलं. दरम्यान त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी मुंबईत एक डान्स अकॅडमी उघडली आणि तिथे डान्स शिकवायला सुरुवात केली. मधुमती त्यांच्या उत्कृष्ट नृत्यासाठी ओळखल्या जात होत्या आणि त्यांची तुलना थेट दिग्गज अभिनेत्री हेलनशी केली जात होती. मधुमती यांच्या निधनानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमार, चंकी पांडे आणि विंदू दारा सिंह यांनी मधुमती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
अक्षय कुमारने शेअर केला मधुमती यांचा फोटो
अक्षय कुमारने समाज माध्यमावर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीमध्ये तो अभिनेत्री मधुमती यांच्यासोबत दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "माझ्या पहिल्या गुरू, ज्यांच्याकडून मी डान्सबद्दल सर्व काही शिकलो. तुमची पावलं पाहून मी डान्स करायला शिकलो. तुमची अदा, प्रत्येक हावभावात तुमची आठवण नेहमीच राहील..."
विंदू दारा सिंह यांनी काढली मधुमतीची आठवण
विंदू दारा सिंह यांनी देखील मधुमती यांचे फोटो शेअर केले आहेत. या सोबत त्यांनी लिहिलं की, "आमच्या शिक्षिका आणि मार्गदर्शक मधुमतीजी यांच्या आत्म्याला शांती लाभो. आपल्यापैकी अनेकांनी या महान व्यक्तिमत्त्वाकडून डान्स शिकलाय आणि त्यांच्या प्रेमानं आणि आशीर्वादांनी भरलेलं सुंदर जीवन जगलंय..."
चंकी पांडेने वाहिली श्रद्धांजली
चंकी पांडेने मधुमती यांचा फोटो शेअर करून आपलं दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेत्यानं मधुमतीकडून डान्सही शिकला आहे.