मुंबई: बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या अभिनय कौशल्याने आणि दिलदार स्वभावामुळे शाहरुख खान जगभरात प्रसिद्ध आहे. शाहरुख खानसोबतच त्याचा 'मन्नत' हा बंगला सतत चर्चेत असतो. अनेकदा, शाहरुख खानने म्हटले आहे की, 'मन्नत हा बंगला आपल्यासाठी खूप भाग्यवान आहे'. अशातच, शाहरुख खानला त्याच्या घरासाठी सरकारकडून 9 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की, नेमकं कोणत्या कारणामुळे शाहरुख खानला सरकारकडून 9 कोटी रुपये मिळणार आहेत? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला 9 कोटी रुपये देणार आहे. खरंतर, 2019 मध्ये अभिनेत्याने मन्नतचा भाडेकरार बदलण्यासाठी महाराष्ट्र सरकारला 25% शुल्क भरले होते, जे 25 कोटींपेक्षा जास्त होते. मात्र, यामध्ये एक चूक झाली होती. ही रक्कम जमिनीच्या आधारावर नाही तर बंगल्याच्या आधारावर देण्यात आली होती. या चुकीमुळे आता शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून 9 कोटी रुपये परत केले जातील.
गौरी खानने दाखल केली होती याचिका:
जेव्हा शाहरुख खानच्या पत्नीला हे संपूर्ण प्रकरण लक्षात आले, तेव्हा तिने परतफेडीसाठी अर्ज केला, जो या आठवड्यात मंजूर झाला आहे. या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे की, शाहरुख खानला त्याच्या वांद्रे पश्चिमच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या 'मन्नत' च्या भाडेकरारात बदल करण्यासाठी सरकारला दिलेले अतिरिक्त 9 कोटी रुपये परत करावे लागतील.
'ही' आहे शाहरुख खानच्या बंगल्याची किंमत:
शाहरुख खानचा बहुचर्चित मन्नतशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. एकदा शाहरुख खानने सांगितले होते की, 'हे घर बांधताना मी पैसे कमावण्यासाठी अनेक चित्रपट साइन केले होते. खरंतर, हे घर बांधणं माझ्यासाठी सर्वात मोठं स्वप्न होतं'. यामुळे शाहरुख खानने त्याच्या बंगल्याचं नाव 'मन्नत' ठेवले आहे. शाहरुखच्या बंगल्याबद्दल बोलायचे झाल्यास, मन्नत हा बंगला वांद्रे पश्चिम येथे आहे. शाहरुख खानच्या बंगल्याची मालमत्ता 2 हजार 446 चौरस फूट पसरलेली आहे. सूत्रांनुसार, या बंगल्याची किंमत अंदाजे 200 कोटी रुपयांहून अधिक आहे. 2001 मध्ये शाहरुख खानने हा बंगला 13.01 कोटी रुपये देऊन खरेदी केला होता.