गाणी म्हटल्यानंतर तो सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यातूनही आपल्या आवडीची गाणी ऐकायला मिळाली तर ती प्रेक्षकांना हवी असतात. या प्रवासात गझल हा काव्यप्रकार असा आहे की जो रसिक प्रेक्षकांना आवडतो. प्रेम, विरह आणि अस्तित्वाच्या जाणिवा या गझलमध्ये दडलेले असतात. तो अंतकरणातही स्थान निर्माण करतो. थेट हृदयाशी नाते जोडणारे काव्य म्हणजे गझल हे आता प्रेक्षकांना सांगावे लागत नाही. ते प्रसन्न अशा वातावरणात, निवांतपणे ऐकायला मिळाले तर ते प्रेक्षकांना हवे असते.
गायक आणि त्यांच्याबरोबर संगीतसाद करणाऱ्यांना सुद्धा तसे काहीसे वातावरण हवे असते. वरळीच्या नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने हा आनंद विनामूल्य प्रेक्षकांना दिला जाणार आहे. त्यासाठी गायक, संगीतकार, 'गारवा' फेम मिलिंद इंगळे यांना निमंत्रित केले आहे. कलेच्या सर्वच प्रांतात त्यांनी योगदान दिलेले आहे. त्यांच्या नवनवीन प्रयोगाचे प्रेक्षकांनी देश-विदेशात स्वागत केले आहे. किशोरकुमार यांची गाणी, गारवाची मैफिल, गवय्या ते खवय्या असे अनेक विविध पैलू त्यांच्या रंगमंच आविष्कारातून दिसलेले आहे. गायक, संगीतकार म्हणूनही ते जेवढे परिचयाचे आहेत. तेवढेच ते गजल अभ्यासक म्हणूनही परिचयाचे आहेत. आवश्यक तिथे काव्यही लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या प्रवासात प्रेक्षकांना ज्या अनेक गोष्टी भावल्या त्यात गझलचे सादरीकरण करावे तर ते त्यांनीच. प्रेक्षकांची ही इच्छा त्यांनी आपल्या पद्धतीने जपलेली आहे.
मिलिंद इंगळे म्हटल्यानंतर रसीकांना 'गारवा' आठवणार नाही असे होणार नाही. महाराष्ट्र, भारत इतकेच काय तर परदेशात या गारव्याने रसिक प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध, सुखद आनंद दिलेला आहे. असे हे मिलिंद इंगळे हृदयाला स्पर्श करणारा गझलचा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. 'मुखातिब' हा त्यांचा कार्यक्रम आहे. जो नेहरू सेंटरच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी सादर करण्याचे ठरवलेले आहे. 8 ऑक्टोबर 2025 सायंकाळी 7 वाजता वरळीच्या नेहरू सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश पत्रिका 3 ऑक्टोबर पासून सकाळी 10.30 वाजल्यापासून तिकीट काउंटरवर उपलब्ध होतील. मिलिंद इंगळे यांच्या संगीतकार कारकीर्दीचा मागोवा घेतल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटावे अशी गोष्ट त्यांच्या बाबतीत घडलेली आहे. अनेक पिढ्यांनी संगीताचा वारसा जपलेला आहे. इंगळे त्यापैकी एक आहेत. ते पाचव्या पिढीचे साक्षीदार आहेत. वडिलांकडून त्या विषयाचे शिक्षण घेतलेच पण गझल उत्तमपणे सादर करता यावे यासाठी अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतलेले आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी इंगळे यांना खऱ्या अर्थाने स्वीकारलेले आहे. एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून ते प्रेक्षकांना जिंकणार आहेत. त्याच्यासाठी विशाल धुमाळ, चिंटू सिंग वासीर, समीर शिवगार यांची संगीत साद त्याला लाभणार आहे आणि सुहैल अख्तर या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत.