सणासुदीच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईत अतिक्रमणे व निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 खाद्यपदार्थ आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये मुंबईतील अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या ‘सूरज लामा मोमोज’ (Suraj Lama Momos) या अंधेरी पश्चिम येथील मूळ शाखेचा समावेश आहे. अन्नाची हाताळणी, स्वच्छता आणि साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
सेलिब्रिटी ड्रायव्हर ते प्रसिद्ध मोमो ब्रँडचा प्रवास
सूरज लामा यांनी वयाच्या 14 व्या वर्षी दार्जिलिंगमधून मुंबईत येत विविध किरकोळ कामे केली. त्यानंतर त्यांनी सुमारे 25 वर्षे बॉलिवूड अभिनेते सोनाक्षी सिन्हा, शाहिद कपूर आणि करण जोहर यांच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’साठी ड्रायव्हर म्हणून काम केले. 2017 मध्ये त्यांनी नोकरी सोडत सायकलवरून मोमो विक्री सुरू केली. सोनाक्षी सिन्हा व तिच्या कुटुंबाला त्यांनी बनवलेले मोमोज खूप आवडले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी विजयाता यांनीही गायक केके (KK) यांच्या घरातील आचारी पदाची नोकरी सोडून या व्यवसायात सहभाग घेतला.
दिवसाला 16,000 मोमोजची निर्मिती आणि विस्तार
सायकलवरून सुरू झालेला हा प्रवास पुढे वर्सोवा, मालाड आणि कांदिवली येथील आउटलेट्सपर्यंत पोहोचला. 2024 मधील माहितीनुसार, मुंबईतील त्यांच्या ‘सेंट्रल किचन’मध्ये 25 जणांची टीम दररोज सुमारे 16,000 मोमोज तयार करत होती. “आम्ही कोणतेही कृत्रिम रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरत नाही आणि गुणवत्तेशी तडजोड करत नाही,” असा दावा सूरज लामा यांनी केला होता. सुरवातीला दोघे मिळून महिन्याला 30,000 रुपये कमवत होते, परंतु व्यवसाय सुरू झाल्यावर सूरज एकटाच दिवसाला 700 रुपये कमवू लागला होता.
हेही वाचा – पहिल्या कमाईबद्दल प्रश्न विचारताच हिटमॅन भावुक; म्हणाला कुटुंबीयांशी बोलण्याची इच्छा….
गुणवत्तेच्या दाव्यांनंतरही एफडीएची कठोर कारवाई
उत्कृष्ट गुणवत्तेचे दावे केले जात असतानाही, एफडीएला या दुकानात अन्न सुरक्षेशी संबंधित अनेक त्रुटी आढळून आल्या. अन्न हाताळणीतील अस्वच्छता आणि दूषित होण्यापासून रोखणाऱ्या उपाययोजनांचा अभाव यामुळे ही कारवाई अनिवार्य ठरली. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनेला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.