मुंबई: बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेला ‘हेरा फेरी’ सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळी चर्चेचं कारण काहीसं निराशाजनक आहे. बाबूराव गणपतराव आपटे हे अविस्मरणीय पात्र साकारणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’मधून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय कुमारही घेणार होता एक्झिट?
‘हेरा फेरी 3’च्या सुरुवातीच्या टप्प्यात अक्षय कुमार या चित्रपटाचा भाग नसेल, अशी बातमी समोर आली होती. इतकंच नव्हे तर, त्यांच्या जागी कार्तिक आर्यन भूमिका साकारणार अशी अफवा होती. या बातमीमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. मात्र नंतर अक्षय कुमार आणि निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्यातील वाद मिटल्याचे स्पष्ट झाले. अक्षयने स्वतः जाहीर केलं की तो पुन्हा ‘राजू’च्या भूमिकेत परतणार असून, प्रियदर्शनच या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. यामुळे चाहत्यांचा उत्साह पुन्हा वाढला होता.
सुनील शेट्टीची भावनिक प्रतिक्रिया
‘हेरा फेरी’ चित्रपटातील श्यामची भूमिका साकारणारे सुनील शेट्टी यांनी अलीकडे एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'जर बाबू भैय्या आणि राजू नसेल, तर श्यामचं काहीच अस्तित्व नाही. ती केमिस्ट्रीच या सिनेमाचं यश आहे.'
सुनील शेट्टी सध्या ‘केसरी वीर’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असले, तरी ‘हेरा फेरी’ विषयी त्यांनी स्पष्ट मत मांडलं आहे.
परेश रावल यांनी सिनेमातून माघार का घेतली?
एका प्रसिद्ध पोर्टलशी बोलताना परेश रावल यांनी खुद्द ही माहिती दिली आहे. त्यांच्या आणि सिनेमाच्या निर्मात्यांमध्ये क्रिएटिव्ह मतभेद झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.
‘हेरा फेरी’ फ्रँचायझीच्या यशामध्ये बाबूरावचं योगदान
‘हेरा फेरी’ (2000) आणि ‘फिर हेरा फेरी’ (2006) हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले होते. विशेषतः बाबूराव हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. त्यांचे संवाद, देहबोली आणि विनोदी शैली हीच या फ्रँचायझीची खरी ओळख बनली आहे.
नवीन पात्र की रिक्त जागा?
परेश रावल यांच्यानंतर आता प्रश्न निर्माण झाला आहे. बाबूरावच्या पात्राची जागा नवीन कलाकार घेणार का? की निर्माते हे पात्रच वगळणार? यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘हेरा फेरी 3’चे भविष्य अनिश्चित, पण उत्सुकता कायम
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन असणार असल्याचे समोर आलं असलं, तरी सतत होणारे बदल, कलाकारांचे माघारी जाणे आणि पटकथेतील अनिश्चितता यामुळे ‘हेरा फेरी ३’चे भवितव्य सध्या तरी धूसर वाटत आहे. मात्र एक गोष्ट नक्की बाबूराव, श्याम आणि राजूचं त्रिकुट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलंय.
हेरा फेरी 3 नेमकं कोणत्या कलाकारांसोबत, कोणत्या कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येईल, हे पाहणं आता औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. बाबूरावचं पात्र परत येणार का, की सिनेमात नवा ट्विस्ट असेल? या सगळ्याचा खुलासा होईपर्यंत चाहत्यांची नजर ‘हेरा फेरी’च्या प्रत्येक अपडेटकडे लागून राहणार, हे मात्र नक्की.