ऑस्करसारख्या जगातील सर्वोच्च सिनेपुरस्काराच्या व्यासपीठावर भारतीय सिनेमाचे नाव पुन्हा एकदा झळकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्कर्स 2026 च्या शर्यतीत भारताचा ‘होमबाउंड’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीतील प्राथमिक शॉर्टलिस्टमध्ये दाखल झाला असून, त्यामुळे भारतीय चित्रसृष्टीसाठी हा क्षण अभिमानाचा मानला जात आहे. 98 व्या अकादमी पुरस्कारांसाठी जगभरातून आलेल्या तब्बल 86 चित्रपटांमधून केवळ 15 सिनेमांची निवड करण्यात आली आहे. या निवडक यादीत ‘होमबाउंड’चा समावेश होणे हे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे. पुढील टप्प्यात, जानेवारी 2026 मध्ये या 15 चित्रपटांपैकी अंतिम नामांकनासाठी फक्त 5 चित्रपटांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ऑस्करपर्यंतचा प्रवास अजून बाकी असला, तरी ‘होमबाउंड’ने पहिले भक्कम पाऊल नक्कीच टाकले आहे.
अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने इतर 12 श्रेणींमधील शॉर्टलिस्टही जाहीर केली आहे. यामध्ये माहितीपट, सिनेमॅटोग्राफी, ध्वनी, व्हिज्युअल इफेक्ट्स, मेकअप आणि हेअरस्टायलिंग, गाणे, संगीत तसेच नव्या कास्टिंग श्रेणीचा समावेश आहे. विविध देशांतील कलाकार आणि कलाकृती या यादीत झळकल्याने ऑस्करची उत्सुकता अधिक वाढली आहे. आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत निवड झालेले चित्रपट त्यांच्या दर्जेदार आशयामुळे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. या यादीत अर्जेंटिनाचा ‘बेलेन’, जॉर्डनचा ‘ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू’, ब्राझीलचा ‘द सीक्रेट एजंट’, इराकचा ‘द प्रेसिडेंट्स केक’, फ्रान्सचा ‘इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट’, जर्मनीचा ‘साउंड ऑफ फॉलिंग’, जपानचा ‘कोकुहो’, नॉर्वेचा ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’, पॅलेस्टाईनचा ‘पॅलेस्टाईन 36’, तैवानचा ‘लेफ्ट-हँडेड गर्ल’, दक्षिण कोरियाचा ‘नो अदर चॉइस’, स्पेनचा ‘सिरात’, स्वित्झर्लंडचा ‘लेट शिफ्ट’, ट्युनिशियाचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ आणि भारताचा ‘होमबाउंड’ यांचा समावेश आहे.
या निवडीसाठी अकादमीच्या सर्व शाखांतील सदस्य प्राथमिक मतदान प्रक्रियेत सहभागी होतात. मतदानासाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित सदस्यांनी निवडलेले चित्रपट पाहणे अनिवार्य असते. अंतिम नामांकनाच्या फेरीपूर्वी सर्व सहभागी सदस्यांनी शॉर्टलिस्टमधील 15 चित्रपट पाहणे बंधनकारक असते. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काटेकोर आणि पारदर्शक मानली जाते.
होमबाउंड या चित्रपटाची कथा दिग्दर्शक नीरज घायवान यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मांडली आहे. उत्तर भारतातील ग्रामीण भागात घडणारी ही कहाणी दोन बालपणीच्या जिवलग मित्रांसंदर्भात आहे. चंदन कुमार आणि मोहम्मद शोएब हे दोघेही पोलीस दलात भरती होण्याच्या स्वप्नाने परीक्षा तयारी करत असतात. दलित कुटुंबातील चंदन आणि मुस्लिम कुटुंबातील शोएब यांच्यासाठी ही नोकरी केवळ रोजगाराचे साधन नसून, ती त्यांच्या अस्तित्वाची, प्रतिष्ठेची आणि सुरक्षित भविष्याची लढाई आहे. करोना काळातील अडचणी, वाढती बेरोजगारी, सामाजिक बहिष्कार, धार्मिक तणाव आणि वाढती निराशा यामधून जाताना त्यांच्या मैत्रीची कठीण परीक्षा होते.
हा सिनेमा कान्स चित्रपट महोत्सवात ‘अन सर्टन रिगार्ड’ विभागात प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत या सिनेमाचे कौतुक केले. ‘होमबाउंड’मध्ये इशान खट्टर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेत असून, जान्हवी कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. या सिनेमाची निर्मिती करण जोहर यांनी केली आहे. सामाजिक वास्तव, मानवी भावना आणि कठोर सत्याची प्रामाणिक मांडणी यामुळे ‘होमबाउंड’ केवळ एक सिनेमा न राहता, प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरतो. ऑस्करच्या अंतिम पाच चित्रपटांमध्ये ‘होमबाउंड’ स्थान मिळवतो का, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: IPL Inspiring Story: आई फुले विकायची, वडील मैदान सांभाळायचे; आज मुलगा आयपीएलचा स्टार