मेघालय: सिंगर कनिका कपूर हिच्या लाईव्ह कन्सर्टमधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू विराट कोहली खेळत असलेल्या सामन्यात एक व्यक्ती मैदानात धावत आला आणि विराटच्या पायाला पडकण्याचा प्रयत्न केला होता. त्याचसारखी घटना आता कनिका कपूरच्या परफॉर्मन्सदरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
हा व्हिडिओ मेघालय येथे सुरू असलेल्या मेगाँग फेस्टिव्हलमधील कार्यक्रमादरम्यानचा असून, परफॉर्मन्स सुरू असताना अचानक एक व्यक्ती गर्दीतून पुढे येत स्टेजवर आला आणि कनिका कपूरच्या पायाला धरून तिला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या अचानक घडलेल्या प्रकारानेही कनिका कपूर बिल्कुल घाबरली नाही. तिने तिच्या परफॉर्मन्समध्ये क्षणभरही खंड पडू दिला नाही. उलट ती शांतपणे गात राहिली आणि कार्यक्रम सुरू ठेवला.
घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला स्टेजवरून दूर नेले. काही सेकंदांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. मात्र हा संपूर्ण प्रसंग प्रेक्षकांनी रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करता क्षणीच पाहता पाहता व्हायरल झाला.
या व्हिडिओवर नेटिझन्स दोन गटात विभागलेले दिसत आहेत. काही जण कनिका कपूरचे शांत, स्थिर आणि व्यावसायिक वर्तन (professionalism) कौतुकास्पद असल्याचे म्हणत आहेत. त्यांना वाटते की कनिकाने घाबरून प्रतिक्रिया न देता परफॉर्मन्स सुरू ठेवल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने प्रोफेशनल कलाकार असल्याचे सिद्ध होते.
काही जण या संपूर्ण प्रकाराला स्क्रिप्टेड सांगत आहेत. त्यांचे मत आहे की हा प्रसंग विराट कोहलीसोबत घडलेल्या घटनेशी खूप मिळताजुळता असून, कदाचित यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देशही असू शकतो. कनिका कपूर ही बॉलीवुडमधील लोकप्रिय गायिकांपैकी एक असून आपल्या गाण्यांसोबतच ती फॅशन स्टाईल आणि ग्लॅमरस लुक नेहमी चर्चेत असते. वर्ष 2022 मध्ये तिने केलेल्या दुसऱ्या विवाहामुळेही मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. आता या नवीन व्हायरल व्हिडिओमुळे कनिका पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.