Kapil Sharma Show Controversy: जगाला हसवणारा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show) सध्या स्वतःच मोठ्या संकटात सापडला आहे. नेटफ्लिक्सवरील या शोच्या निर्मात्यांवर गाण्यांचा आणि पात्रांचा विनापरवाना वापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) व्यावसायिक खटला दाखल करण्यात आला असून कपिलच्या शोला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
तीन सुपरहिट गाण्यांमुळे वाढला वाद
फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (PPL) इंडिया या संस्थेने हा खटला दाखल केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, 21 जून ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान प्रसारित झालेल्या तिसऱ्या सीझनमध्ये खालील तीन गाजलेल्या गाण्यांचा वापर कोणत्याही परवान्याशिवाय करण्यात आला:
'एम बोले तो' (मुन्ना भाई MBBS, 2003)
'रामा रे' (कांटे, 2002)
'सुबह होने ना दे' (देसी बॉईज, 2011)
पीपीएल इंडियाच्या मते, व्यावसायिक शोमध्ये ही गाणी वापरण्यासाठी आवश्यक असलेला कॉपीराइट परवाना निर्मात्यांनी घेतला नाही. 6 नोव्हेंबरला पाठवलेल्या नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.
'बाबूराव' पात्राचा 25 कोटींचा वाद
कपिल शर्माचा शो वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 'हेरा फेरी' चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनीही शोला तब्बल 25 कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. शोमध्ये कीकू शारदाने साकारलेले 'बाबूराव गणपतराव आपटे' हे पात्र आपला ट्रेडमार्क असून त्याचा वापर बेकायदेशीर असल्याचे नाडियाडवाला यांचे म्हणणे होते.
हेही वाचा – Gnyanada Ramtirthakar : ज्ञानदा रामतीर्थकरने उरकला साखरपुडा? नवरदेवाचे नाव गुलदस्त्यात
सध्या या संपूर्ण कायदेशीर पेचावर कपिल शर्मा, नेटफ्लिक्स किंवा शोच्या प्रॉडक्शन हाऊसने (K9 Films) कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र, या खटल्यामुळे शोच्या लोकप्रियतेवर आणि आगामी भागांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बौद्धिक संपदा अधिकारांच्या (IP Rights) या लढाईत आता न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.