Madhuri Pawar : सततच्या ऑनलाईन छळाला माधुरी पवार कंटाळली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्रास दिला जात असल्याने मानसिक तणाव वाढला असून, आता घराबाहेर पडतानाही सुरक्षेची भीती वाटत असल्याचे अभिनेत्री माधुरी पवारने म्हटले आहे.

Madhuri Pawar : सततच्या ऑनलाईन छळाला माधुरी पवार कंटाळली; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी

Madhuri Pawar Cyber Harassment: ‘अप्सरा आली’ या रिॲलिटी शोची विजेती आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधुरी पवार हिने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत तिला होणाऱ्या ऑनलाईन छळाची व्यथा मांडली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्रास दिला जात असल्याने मानसिक तणाव वाढला असून, आता घराबाहेर पडतानाही सुरक्षेची भीती वाटत असल्याचे तिने म्हटले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याची कळकळीची विनंती तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.  

गेल्या 3 वर्षांपासून छळ, विकिपीडिया पेज डिलीट आणि कॉल बॉम्बिंग
माधुरी पवारच्या मते, हा त्रास गेल्या 3 वर्षांपासून सुरू असून सोशल मीडियावरील तिच्या पोस्टवर अत्यंत आक्षेपार्ह आणि घाणेरड्या कमेंट्स केल्या जात आहेत. याशिवाय तिचे विकिपीडिया (Wikipedia) पेज हटवण्यात आले असून काही फॅन पेजेस हॅक करून डिलीट करण्यात आले आहेत. तिच्या ऑफिशियल कामाच्या नंबरवर सातत्याने ‘कॉल बॉम्बिंग’ केले जात असल्याने फोन वाजत राहतो आणि कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यामागे नेमकी कोणाची विकृत मनोवृत्ती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  

सायबर पोलिसांत तक्रार दाखल; मनसे चित्रपट सेनेची भेट  
या ऑनलाईन त्रासाविरोधात माधुरीने सायबर पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. मात्र, छळ थांबत नसल्याने तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. यानंतर तिने मनसे चित्रपट सेनेच्या कार्यालयात जाऊन अमेय खोपकर आणि शालिनी ठाकरे यांची भेट घेतली. या प्रकरणामागील दोषींचा शोध लावून लवकरात लवकर कडक कारवाई केली जाईल, असा पूर्ण विश्वास मनसेकडून तिला देण्यात आला आहे.  

‘मला न्याय आणि संरक्षण हवे’; सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्र्यांना भावनिक साकडे
एक महिला कलाकार म्हणून ही परिस्थिती अत्यंत भीतीदायक आणि मानसिकदृष्ट्या खचवून टाकणारी असल्याचे माधुरीने नमूद केले. “मला कोणाचेही नुकसान करायचे नाही, फक्त माझी प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपली जावी. यामागे कोण आहे याचा निष्पक्ष तपास व्हावा,” अशी मागणी तिने केली आहे. सोशल मीडियाद्वारे राज्यातील वरिष्ठ नेत्यांना भावनिक साकडे घालत तिने एक कलाकार आणि स्त्री म्हणून योग्य ती मदत व कायदेशीर संरक्षण पुरवण्याची आग्रही विनंती केली आहे.

हेही वाचा – Bhuleshwar Raja 2026: आगमन मिरवणुकीतील दुर्घटनेनंतर भुलेश्वरच्या राजाच्या मंडळाचा मोठा निर्णय; यंदा…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number