Saturday, February 14, 2026 03:44:51 AM

Stray Dogs Issue: भटक्या कुत्र्यांचा वाद पेटलेला असतानाच मोठी घोषण! सुप्रसिद्ध गायक देणार 10 एकर जमीन; नेमकं प्रकरण काय?

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गायक मिका सिंग यांनी मानवी उपाय सुचवत 10 एकर जमीन दान करण्याची तयारी दर्शवली आहे.

stray dogs issue भटक्या कुत्र्यांचा वाद पेटलेला असतानाच मोठी घोषण सुप्रसिद्ध गायक देणार 10 एकर जमीन नेमकं प्रकरण काय

Stray Dogs Issue: देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हा विषय सध्या समाज आणि न्यायव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेषतः महिलांवर आणि लहान मुलांवर झालेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता मिका सिंग यांनी एक वेगळाच आणि धाडसी निर्णय घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत केवळ कठोर निर्णय घेण्याऐवजी मानवी आणि दीर्घकालीन उपायांची गरज असल्याचे मिका सिंग यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करत, रस्त्यांवर फिरणाऱ्या कुत्र्यांवर अन्यायकारक कारवाई टाळावी, अशी भूमिका मांडली आहे. यासोबतच, या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेत भटक्या कुत्र्यांच्या देखभालीसाठी 10 एकर जमीन दान करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

JM

मिका सिंग यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून आपली भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांवर उपाय आवश्यक आहेत, मात्र त्यासाठी हिंसक किंवा अमानवी पद्धतीचा अवलंब होऊ नये. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर कुत्र्यांसाठी स्वतंत्र शेल्टर होम उभारता येईल, जिथे त्यांना सुरक्षित निवारा, नियमित अन्न-पाणी, वैद्यकीय उपचार आणि आवश्यक लसीकरणाची सुविधा मिळू शकेल.

या प्रस्तावित सुविधांमुळे एकीकडे रस्त्यांवरील कुत्र्यांची संख्या नियंत्रित करता येईल, तर दुसरीकडे त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाईल, असा विश्वास मिका सिंग यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, केवळ बंदी किंवा हटवण्याचे आदेश देण्यापेक्षा अशा स्वरूपाच्या योजनांमधूनच कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो.

दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणीखाली आहे. न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे की, रस्त्यांवरील कुत्र्यांना हटवण्याचा कोणताही आदेश दिलेला नसून, पशु जन्म नियंत्रण (ABC) नियम 2023 ची प्रभावी अंमलबजावणी हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांकडून नियमांची योग्य अंमलबजावणी न होणे, हेही न्यायालयाने अधोरेखित केले आहे.

मिका सिंग यांच्या या प्रस्तावाचे अनेक स्तरांतून स्वागत होत आहे. काही जणांनी हा निर्णय संवेदनशील आणि जबाबदार असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी सरकार आणि स्थानिक प्रशासनाने अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता सुप्रीम कोर्ट या प्रस्तावावर काय भूमिका घेते आणि भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर पुढे कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या