Om Bhutkar Wedding: ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला मराठी सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता ओम भुतकर याने गुपचूप लग्न उरकल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. ओमच्या लग्नाचे काही फोटो अचानक समोर आल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. मात्र, हा खरोखरच त्याचा विवाहसोहळा आहे की त्याच्या आगामी प्रोजेक्टमधील एखाद्या दृश्याचे शूटिंग आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये सध्या कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
मित्र अभय महाजनच्या ‘त्या’ पोस्टमुळे संशय वाढला
ओम भुतकरचा जवळचा मित्र आणि अभिनेता अभय महाजन याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या फोटोमध्ये ओम हा नवरदेवाच्या पारंपरिक पोशाखात अतिशय आनंदात दिसत आहे. विशेष म्हणजे, अभयने या फोटोमध्ये ओमला केवळ टॅग केले असून लग्नाबद्दल शुभेच्छा देणारा कोणताही संदेश लिहिलेला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदुलकरचेही अशाच प्रकारचे फोटो व्हायरल झाले होते, जे नंतर तिच्या एका चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ओमच्या या फोटोंमागचे सत्य अद्याप गुलदस्त्यातच आहे.
‘तुंबाडची मंजुळा’नंतर आता ‘मुळशी पॅटर्न 2’ कडे चाहत्यांचे लक्ष
ओम भुतकर नुकताच ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता, ज्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. दरम्यान, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकतीच ‘मुळशी पॅटर्न 2’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यामुळे या सिक्वेलमध्ये ओम पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत धुमाकूळ घालणार का, याकडे त्याच्या चाहत्यांचे डोळे लागले आहेत. अभिनय क्षेत्रात व्यस्त असलेला ओम सध्या या व्हायरल फोटोंमुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे.