नवी दिल्ली : आता चित्रपट पाहायला जाणं म्हणजे खिशाला चांगलाच फटका बसत असतो. सिनेमा तिकिटं महाग तर आहेतच, पण मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक, आणि अगदी पाण्याच्या बाटलीचेही दर ऐकून कुणालाही धक्का बसेल. 50 रुपयांचे कोल्ड ड्रिंक आत 400 रुपयांना, आणि 20 रुपयांची बाटली 100 रुपयांना मिळते! हे पाहून सर्वोच्च न्यायालयालाही संताप आला आणि न्यायालयाने मल्टिप्लेक्समधील मनमानी दरांवर ताशेरे ओढले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी घेतली. न्यायमूर्ती नाथ यांनी थेट प्रश्न केला “कॉफीचे 700 रुपये आणि पाण्याच्या बाटलीचे 100 रुपये का घ्यायचे? लोकांना सिनेमा पाहायला येताना आनंद मिळायला हवा, ओझं नाही! हेच चालू राहिलं, तर थिएटर रिकामं होईल.”
कर्नाटक सरकारने राज्यात चित्रपट तिकिटांची कमाल किंमत 200 रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने या निर्णयाला आव्हान दिलं आहे. त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “ताज हॉटेलमध्ये कॉफी 1000 रुपयांची मिळते, मग तिची किंमतही सरकार ठरवणार का? हा पूर्णपणे लोकांचा पर्याय आहे. लोकांना साध्या थिएटरमध्ये जायचं असेल, तर जाऊ शकतात ना!” यावर न्यायमूर्ती नाथ यांनी प्रत्युत्तर दिलं, “साधी थिएटरं उरलीच कुठे आहेत? आज सगळीकडे मल्टिप्लेक्सच आहेत! म्हणूनच आम्ही सांगतोय, तिकिटांचा दर 200 रुपयांपेक्षा जास्त नसावा.” न्यायालयाने हेही सांगितलं की, मल्टिप्लेक्सना प्रत्येक तिकिटाचा तपशीलवार हिशोब ठेवावा लागेल आणि वेळोवेळी चार्टर्ड अकाउंटंटकडून पडताळणी करवून घ्यावी लागेल.
हेही वाचा: Salman Khan: पान मसाल्याच्या जाहिरातीवरून सलमान खानला कोटा न्यायालयाची नोटीस; “केसरयुक्त पान मसाला”वर फसव्या प्रचाराचा आरोप
कर्नाटक सरकारने या निर्णयाचं समर्थन करत म्हटलं की, “हे सर्व ग्राहकांच्या फायद्यासाठी आहे. जर राज्याने केस जिंकली, तर ज्या लोकांनी जास्त पैसे दिले आहेत त्यांना परतावा मिळेल. उदाहरणार्थ, कोणी आज 1000 रुपये दिले असतील आणि निर्णय आमच्या बाजूने आला, तर त्याला 800 रुपये परत मिळतील.” लोक मात्र म्हणतात “सिनेमा पाहायला जाऊन परत येईपर्यंत खिशातली नोटांची गाठ सुटते!” सोशल मीडियावर लोकांचे अनुभव धडाधड शेअर होत आहेत. एका युजरने लिहिलं, “तिकिट 500 रुपयाचं, पण पॉपकॉर्नसाठी अजून 700 रुपये! चित्रपट पाहतोय की लग्न कार्याला जातोय?”
चित्रपट समीक्षक हिमेश मनकड यांनीही यावर भाष्य केलं, “मल्टिप्लेक्स चेन सामान्य प्रेक्षकांना सिनेमा हॉलपासून दूर नेत आहेत. महागाईमुळे लोक आता घरीच ओटीटीवर चित्रपट पाहणे पसंत करत आहेत.” केवळ प्रेक्षकच नाही, तर सेलिब्रिटींनीही या समस्येकडे लक्ष वेधलं आहे. दिग्दर्शक करण जोहर यांनी गेल्या वर्षी म्हटलं होतं, “चार जणांचं एकत्र चित्रपट पाहणं म्हणजे आता 10,000 रुपयांचा खर्च!” कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या 2023 च्या अहवालानुसार, मल्टिप्लेक्समध्ये सरासरी एका व्यक्तीचा खर्च 1,800 रुपये आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंब आता सिनेमा हॉलपासून दूर जात आहेत आणि महामारीनंतर प्रेक्षकसंख्या तब्बल 15 टक्क्यांनी कमी झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या ताशेऱ्यानंतर मात्र लोकांमध्ये थोडीशी आशा निर्माण झाली आहे. कदाचित लवकरच चित्रपट पाहायला जाणं पुन्हा एकदा परवडणारं आणि आनंददायी ठरेल!
हेही वाचा: PM Modi ICC Worldcup women Meeting : पंतप्रधान मोदींनी आयसीसी महिला विश्वचषक ट्रॉफीला हात लावला नाही, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक