Priyanshu Kshatriya Death: अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटात काम केलेल्या अभिनेता प्रियांशू क्षत्रिय (उर्फ बाबू छेत्री) याचा नागपूरमध्ये वैयक्तिक वैमनस्यातून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने चित्रपटसृष्टीसह नागपूरकरांमध्ये खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री साडेएकच्या सुमारास नागपूरच्या नारा परिसरात, प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत आढळला. त्याचा गळा वायरने चिरलेला होता आणि शरीरावर जखमांचे खोल निशाण होते. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, प्रियांशूला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आरोपी अटकेत
प्रियांशूच्या बहिणी शिल्पा छेत्री हिने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ध्रुव शाहू या आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी ध्रुव शाहूला अटक केली असून, प्रियांशूच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास सुरू आहे, असे जरीपटका पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - Nanded: प्रॉपर्टीच्या वादातून बायकोची नवऱ्याला बेदम मारहाण, धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अमिताभ बच्चनसोबत पडद्यावर काम
प्रियांशू क्षत्रियने 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या जीवनावर आणि त्यांच्या परिवर्तनावर आधारित या चित्रपटात त्याची भूमिका बाबू या पात्राची होती. या पात्राद्वारे त्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकाच्या मानसिक संघर्षाचे प्रभावी चित्रण केले होते. प्रियांशूच्या संवादकौशल्याने आणि भावनात्मक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटात सुधारण्याचा संदेश देणाऱ्या बाबूची भूमिका साकारणारा प्रियांशू वास्तविक आयुष्यात मात्र हिंसाचाराचा बळी ठरला.
हेही वाचा - UP Weird News : 'माझी बायको रात्री 'नागीण' बनते अन्...'; पतीच्या विचित्र तक्रारीने अधिकारी चक्रावले
प्रियांशूच्या हत्येमुळे झुंड चित्रपटातील सहकलाकार आणि निर्मात्याला मोठा धक्का बसला आहे. तथापी, नागपूर पोलिसांनी प्रियांशूच्या मित्रपरिवार, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आरोपी ध्रुव शाहूसोबतच्या संबंधांचा तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या मते, हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली असून अधिक आरोपी सामील असण्याची शक्यता आहे.