Asha Bhosle Death: भारतीय संगीत विश्वाचा देदीप्यमान तारा, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर, त्यांच्या अस्थींचे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीत विसर्जन करण्यात आले. 12 एप्रिल रोजी वयाच्या 92 व्या वर्षी आशाताईंनी जगाचा निरोप घेतला होता. आपल्या लाडक्या आजीची अंतिम इच्छा पूर्ण करताना त्यांची नात जनाई भोसले हिला अश्रू अनावर झाले होते.
गंगेच्या पात्रात शेवटचा प्रवास
भोसले कुटुंबीयांनी वाराणसीत शास्त्रोक्त पद्धतीने सर्व विधी पार पाडले. यावेळी एका सजवलेल्या बोटीमध्ये आशा भोसले यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. गंगेच्या संथ पात्रात प्रवास करताना मुलगा आनंद भोसले, सून अनुजा आणि नात जनाई यांनी आशाताईंच्या अस्थींचे विसर्जन केले. या विधींचे काही क्षण जनाईने सोशल मीडियावर शेअर केले असून, "आजीच्या आत्म्याला आता चिरशांती मिळाली असेल," अशी भावना तिने व्यक्त केली आहे.
जनाईची भावूक पोस्ट: "सर्वांत कठीण गोष्ट केली"
आजीच्या अस्थी विसर्जनानंतर जनाईने इन्स्टाग्रामवर एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटले, "ओम शांती.. आजीच्या जवळच्या व्यक्तींसाठी ही गोष्ट करणे अत्यंत कठीण होते, मात्र तिची हीच शेवटची इच्छा होती. वाराणसीच्या पवित्र गंगेत अस्थी विसर्जन करून आम्ही तिला निरोप दिला आहे. तिच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे की, तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा."
हेही वाचा - Big Boss Marathi: बिग बॉस मराठीमध्ये तन्वी कोलतेने मारली बाजी, पण स्वतःचीच पाठ थोपटतोय विशाल; म्हणाला 'मी तर मुलींचा...'
न तुटणारे आजी-नातीचे नाते
आशा भोसले आणि जनाई यांच्यातील नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. आशाताईंच्या शेवटच्या काळापर्यंत जनाई सावलीसारखी त्यांच्यासोबत होती. अंत्यविधीपासून ते शोकसभेपर्यंत जनाईला सावरणे कुटुंबीयांना कठीण जात होते. "माझी आजी लोकांच्या प्रेमास आणि आदरास पात्र होती, ती आपल्या सर्वांच्या हृदयात गाण्यांच्या रूपाने सदैव जिवंत राहील," अशा शब्दांत जनाईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या विसर्जन विधीनंतर भोसले कुटुंबीय मुंबईला परतणार असून, संगीत क्षेत्रातील या महान पर्वाचा प्रवास आता गंगेच्या पवित्र पात्रात विसावला आहे.