संगीतकार आणि गायक पालाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी वैयक्तिक आयुष्यामुळे नव्हे, तर कायदेशीर लढ्यामुळे. मराठी अभिनेता व निर्माते विद्न्यान माने यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर पालाश मुच्छलने थेट न्यायालयाचा मार्ग स्वीकारत १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. माने यांनी केलेले आरोप खोटे, बदनामीकारक आणि हेतुपुरस्सर असल्याचा दावा पालाशने केला आहे.
काही दिवसांपूर्वी विद्न्यान माने यांनी पालाश मुच्छलवर ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात तक्रार दाखल केली होती. याशिवाय, त्यांनी पालाशवर भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू स्मृती मंधानासोबत नात्यात असताना विश्वासघात केल्याचाही आरोप केला होता. या आरोपांमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली.
या पार्श्वभूमीवर पालाश मुच्छलने सोशल मीडियावरून आपली भूमिका स्पष्ट केली. त्याने सांगितले की, त्याच्या वकिलामार्फत सांगली येथील विद्न्यान माने यांना १० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस खोट्या, धक्कादायक आणि त्याची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने केलेल्या आरोपांबाबत असल्याचं त्याने नमूद केलं.

तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये सांगली येथे पालाश आणि विद्न्यान यांची भेट झाली होती. यावेळी विद्न्यान यांनी चित्रपट निर्मितीत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पालाशने आपल्या आगामी ‘नजऱिया’ या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळेल, असा विश्वास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आल्याचाही उल्लेख आहे.
विद्न्यान माने यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ४० लाख रुपये पालाशकडे दिले. मात्र, हा प्रोजेक्ट पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सध्या या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पालाश मुच्छलने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचं स्पष्ट केलं आहे. खोट्या आरोपांमुळे आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमा डागाळली गेल्याचं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळेच कायदेशीर मार्ग अवलंबल्याचं त्याने स्पष्ट केलं.
या संपूर्ण प्रकरणामुळे मनोरंजनसृष्टीत चर्चांना उधाण आलं असून, गुंतवणूक, विश्वास आणि कायदेशीर जबाबदारी यासारख्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.