Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6' च्या घरात सध्या हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये विशाल कोटियन आणि 'ड्रामा क्वीन' राखी सावंत यांच्यात जोरदार राडा झाल्याचे दिसत आहे. टास्क दरम्यान विशालने मर्यादा ओलांडल्याचा आरोप करत राखीने त्याला खडेबोल सुनावले आहेत.
नेमकं घडलं काय?
घरात सध्या 'शाळा' हे विशेष कार्य सुरू असून, गणिताच्या तासावेळी सदस्यांमध्ये प्रचंड झटापट झाली. बॉल्स गोळा करण्याच्या चढाओढीत विशालने राखीला चक्क पाठीमागून उचलले आणि तिला स्विमिंग पूलच्या दिशेने नेले. राखीला उचलून नेल्यानंतर "पुढच्या वेळी पाण्यातच फेकून देईन, आईची शपथ!" अशा शब्दांत विशालने तिला धमकी दिली. विशालच्या या वागण्यामुळे राखीचा पारा चढला. तिने विशालला शेवटची तंबी देत म्हटले, "विशाल, ही तुला शेवटची वॉर्निंग आहे, मला पुन्हा हात लावायचा नाही!" संतापलेल्या राखीने रागाच्या भरात तिथला टेबलही फेकून दिला.
हेही वाचा - Arijit Singh: "भविष्यात काय आहे कुणास ठाऊक..." निवृत्तीनंतर अरिजीत सिंगची पोस्ट व्हायरल, चाहत्यांचे डोळे पाणावले
सोशल मीडियावर नेटकऱ्यांची टीका
विशालचे हे कृत्य केवळ राखीलाच नाही, तर प्रेक्षकांनाही रुचलेले नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विशालवर टीकेची झोड उठवली आहे. एका युझरने संताप व्यक्त करत म्हटले की, "विशाल मुलींना असा हात लावतोय जणू काही ती त्याची वैयक्तिक मालमत्ता आहे." महिला स्पर्धकासोबत अशा प्रकारे शारीरिक बळाचा वापर करणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
आता पुढे काय?
विशालच्या या हिंसक आणि वादग्रस्त वागण्यावर 'बिग बॉस' काय पाऊल उचलणार? त्याला या कृत्याची काय शिक्षा मिळणार? आणि या वादामुळे घरातील समीकरणं कशी बदलणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.