Ramayana Part 1 Trailer Leak: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुप्रतिक्षित ठरलेल्या 'रामायण: पार्ट 1' या चित्रपटाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेक्षक ज्या व्हिडिओची उत्सुकतेने वाट पाहत होते, तो अधिकृत ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर लीक झाला आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या एका खाजगी कार्यक्रमातील हा व्हिडिओ चोरून रेकॉर्ड करून इंटरनेटवर पसरवण्यात आल्याने सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली असून, या घटनेनंतर चित्रपटाच्या टीमने पायरसीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
लीक क्लिपमध्ये काय आहे?
नवी दिल्लीतील 'प्रथम संकल्प' या विशेष प्रीव्ह्यू कार्यक्रमात केवळ निमंत्रित पाहुण्यांसाठी ट्रेलरचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलवर रेकॉर्ड केलेली 1 मिनिट 28 सेकंदाची क्लिप काही वेळातच ऑनलाइन व्हायरल झाली. या क्लिपमध्ये प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरची दमदार एन्ट्री आणि पित्याच्या वचनासाठी वनवासाला निघण्याचा भावूक क्षण पाहायला मिळत आहे. याशिवाय, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये रावणाच्या भूमिकेतील यशचा प्रचंड रौद्र आणि भव्य अवतार दिसून येत आहे.
निर्मात्यांची पायरसीविरोधी कठोर पावले
हा प्रकार उघडकीस येताच निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी आपल्या लीगल टीम आणि अँटी-पायरसी पार्टनर्सना हा अनधिकृत कंटेंट त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी रात्रीपासूनच ही क्लिप हटवण्याचे काम सुरू झाले असून, रविवारी सकाळपर्यंत Reddit वरून व्हिडिओ डिलीट करण्यात यश आले. मात्र, X (ट्विटर) वरून ही क्लिप हटवण्यासाठी कायदेशीर पथकाला मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. लीक झालेल्या क्लिप्स न पाहता अधिकृत रिलीजची वाट पाहावी, असे आवाहन निर्मात्यांनी चाहत्यांना केले आहे.
अधिकृत ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शनाची तारीख
निर्मात्यांच्या नियोजनानुसार 'रामायण: पार्ट 1' चा अधिकृत ट्रेलर 24 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हा भव्य चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर, म्हणजेच 8 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर आणि यश यांच्यासोबत साई पल्लवी, सनी देओल, रवी दुबे, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंग यांसारखी तगडी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.