Kantara Controversy: दाक्षिणात्य चित्रपट 'कांतारा' मधील दैवाची नक्कल करणे बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगला महागात पडले आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली दाखल झालेला FIR रद्द करण्यासाठी रणवीरने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला कोणताही तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील महत्त्वपूर्ण सुनावणी आता उद्या, मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी होणार असून संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
हे प्रकरण 28 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) सुरू झाले. या कार्यक्रमात 'कांतारा'चा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी उपस्थित होता. त्याला भेटल्यानंतर रणवीर सिंगने उत्साहाच्या भरात चित्रपटातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या 'दैवा कोला' मधील एका दृश्याची आणि ओरडण्याची नक्कल केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच कांताराच्या चाहत्यांनी आणि धार्मिक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला. रणवीरने धार्मिक परंपरांची थट्टा केल्याचा आरोप करत त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली.
"याला गुन्हेगारी रंग दिला जात आहे"; वकिलांचा युक्तिवाद
रणवीर सिंगच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, रणवीरने केवळ एक चाहता म्हणून आणि अभिनेत्याबद्दलच्या प्रेमापोटी त्या पात्राची नक्कल केली होती. त्याचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता, मात्र या प्रकरणाला जाणूनबुजून गुन्हेगारी वळण दिले जात असल्याचा दावा वकिलांनी केला. मात्र, उच्च न्यायालयाने रणवीरच्या वकिलांना जोरदार फटकारले. केवळ तो एक बॉलीवूड स्टार आहे म्हणून तपास प्रक्रियेत घाई करता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने विशेष वागणूक देण्याची मागणी फेटाळून लावली.
हेही वाचा - Rashmika-Vijay Wedding : ठरलं तर मग! अखेर रश्मिका आणि विजयने अधिकृतपणे दिली नात्याची कबुली; पोस्ट करत म्हणाले; 'आम्ही आमच्या नात्याची नवी सुरुवात...'
उद्याच्या निकालावर रणवीरचे भवितव्य अवलंबून
न्यायमूर्ती नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील तातडीची सुनावणी टाळली आहे. रणवीरला यापूर्वी सोशल मीडियावर माफी मागावी लागली होती, तरीही कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. उद्या, 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय FIR रद्द करण्याबाबत काय भूमिका घेते, यावर रणवीर सिंगला अटक होणार की दिलासा मिळणार, हे स्पष्ट होईल.