Riteish Deshmukh: महाराष्ट्रासाठी हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस मराठी 6 चा होस्ट रितेश देशमुख भावनाविवश झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पहिल्यांदाच नॅशनल टेलिव्हिजनवर रितेशने आपली भावना व्यक्त केली. बिग बॉस मराठीच्या ‘भाऊचा धक्का’ या विशेष भागाच्या सुरुवातीला रितेशने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील दुःख शब्दांत मांडत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शोच्या शूटिंगआधीच रितेशने अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. त्यानंतर थेट मंचावर उभा राहत, “मला दादांना काही सांगायचंय,” असे म्हणत रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या आवाजातली कंपने आणि डोळ्यांतलं पाणी पाहून उपस्थित प्रेक्षकही भावुक झाले.
रितेशने सांगितलं की, 28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी आनंद घेऊन येण्याऐवजी अंधार घेऊन आली. ही बातमी केवळ एक राजकीय नेत्याच्या निधनाची नव्हती, तर एका आपुलकीच्या, माणुसकी जपणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याची होती. “अजित दादा हे फक्त उपमुख्यमंत्री नव्हते, तर प्रत्येकासाठी आपले माणूस होते,” असे तो म्हणाला.
रितेशने अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना त्यांच्या शब्दांमधील धार, नजरेतील धाक आणि निर्णयक्षमतेचं कौतुक केलं. “त्यांच्या एका आदेशाने रखडलेली कामं मार्गी लागायची. सामान्य माणसासाठी ते कामाचे दादा होते,” असे सांगताना त्याचा सूर अधिकच गंभीर झाला.
अजित पवार यांचा स्वभाव, मिश्किल बोलणं आणि कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी रितेशने आठवली. “कुटुंबाकडे बघ, गावाकडे बघ,” हा त्यांचा संदेश आजही कानात घुमतो, असे सांगत रितेशने त्यांच्या सामाजिक जाणिवांवर प्रकाश टाकला. त्यांच्या रागातही माया होती, आणि त्यांची उपस्थितीच अनेकांसाठी प्रेरणादायी होती, असे तो म्हणाला.
यावेळी रितेशने महाराष्ट्राने गमावलेल्या इतर दिग्गज नेत्यांचाही उल्लेख केला. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, प्रमोद महाजन यांच्यासह अजित पवार यांचे नाव घेत त्याने म्हटले की, “या सगळ्यांनी एकच धर्म पाळला महाराष्ट्र धर्म.” त्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना त्याने व्यक्त केली.
आपल्या भाषणाच्या शेवटी रितेश म्हणाला, “दादा, तुम्ही जिथे कुठे असाल, तिथून आम्हाला सांगत असाल रडत बसू नका, कामाला लागा.” हाच संदेश घेऊन आपण पुढे जात आहोत, असे सांगत त्याने शोची सुरुवात केली.
रितेश देशमुखच्या या भावनिक श्रद्धांजलीनं केवळ बिग बॉस मराठीचं व्यासपीठ नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र भारावून गेला. सोशल मीडियावरही त्याच्या भाषणाची मोठी चर्चा होत असून अनेकांनी त्याच्या शब्दांना महाराष्ट्राच्या भावना असल्याचं म्हटलं आहे.