Salim Khan Hospitalised: बॉलीवूडचे दिग्गज पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांना मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) मध्ये दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंगळवारी सकाळी अभिनेता सलमान खान कडक सुरक्षा व्यवस्थेत रुग्णालयातून बाहेर पडताना दिसल्याने या चर्चेला उधाण आले आहे. सलीम खान यांना नेमक्या कोणत्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबत अद्याप कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.
कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खान कुटुंबातील सर्व सदस्य रुग्णालयात पोहोचले आहेत. सलमान खान व्यतिरिक्त त्याचे जावई अतुल अग्निहोत्री आणि आयुष शर्मा हे देखील रुग्णालयाबाहेर स्पॉट झाले. मुलगी अलविरा खान देखील वडिलांच्या भेटीसाठी पोहोचली असून, कुटुंबीयांच्या सततच्या येण्या-जाण्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. सध्या तरी ही एक नियमित तपासणी आहे की गंभीर समस्या, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘शोले’ आणि ‘डॉन’चे शिल्पकार
सलीम खान यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला ‘जंजीर’, ‘शोले’ आणि ‘डॉन’ सारखे अजरामर ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सलीम-जावेद या जोडीने चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला होता. विशेष म्हणजे, नुकताच 24 नोव्हेंबर 2025 रोजी सलीम खान यांनी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केवळ कथाच लिहिल्या नाहीत, तर ‘अँग्री यंग मॅन’ ही संकल्पना पडद्यावर जिवंत केली.
एकत्रित कुटुंबाचे आदर्श उदाहरण
सलीम खान यांनी आपल्या कुटुंबाला नेहमीच एकत्र ठेवले आहे, जे चित्रपटसृष्टीत एक आदर्श मानले जाते. त्यांना 5 मुले असून – सलमान खान, सोहेल खान, अरबाज खान, अलविरा आणि अर्पिता खान यांचा त्यात समावेश आहे. सध्या संपूर्ण खान कुटुंब त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देऊन असून, चाहते लवकरच त्यांच्या डिस्चार्जची बातमी मिळण्याची वाट पाहत आहेत.