नवी दिल्ली : बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससाठी चित्रपटांइतकीच जाहिरातीदेखील मोठ्या कमाईचं साधन ठरतात. पण या जाहिरातींच्याच माध्यमातून कधी कधी अडचणीही निर्माण होतात. नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता सलमान खान सध्या अशाच वादात अडकला आहेत. कोटा येथील ग्राहक न्यायालयाने पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात सलमान खानला नोटीस बजावली आहे. त्याने केलेल्या जाहिरातींविरुद्ध फसव्या प्रचाराचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार वकील इंदर मोहन सिंग हनी यांनी दाखल केली असून, पान मसाल्याच्या जाहिरातींवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की या जाहिराती ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि युवकांमध्ये चुकीचा संदेश पसरवतात.
ग्राहक न्यायालयात दाखल याचिकेत म्हटले आहे की, राजश्री पान मसाला बनवणारी कंपनी आणि तिचा ब्रँड अॅम्बेसेडर सलमान खानने उत्पादनाचे वर्णन “केसरयुक्त इलायची” आणि “केसरयुक्त पान मसाला” असे करून ग्राहकांची दिशाभूल केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, सुमारे 4 लाख प्रति किलो दराने मिळणारा केसर फक्त 5 च्या पाउचमध्ये वापरणे शक्यच नाही. तक्रारीत आणखी नमूद करण्यात आले आहे की अशा प्रकारच्या जाहिराती युवकांना पान मसाला खाण्यास प्रवृत्त करतात, ज्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. यावर न्यायालयाने सलमान खानला औपचारिक उत्तर सादर करण्यास सांगितले असून, पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचा: Multiplex Overcharging Rates: 50 रुपयांचे कोल्डड्रिंक 400 रुपयांना देता? मल्टिप्लेक्समधील मनमानी दरांवर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान हा जाहिरातींमधून प्रचंड कमाई करतो. त्याची ब्रँड एंडोर्समेंट फी 4 कोटी ते 10 कोटी दरम्यान असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही वर्षांत सलमानने अनेक मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांचा प्रचार केला आहे. ज्यामध्ये पेय पदार्थ, कपड्यांचे ब्रँड आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.
सलमान खान याच्यावरचा हा खटला मनोरंजन क्षेत्रात जाहिरातींच्या नैतिकतेबद्दल नवी चर्चा निर्माण करत आहे. पान मसाल्यासारख्या उत्पादनांवरील सेलिब्रिटींच्या प्रमोशनविषयी आधीही वाद झाले आहेत आणि आता सलमान खान याच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.
हेही वाचा: PM Modi ICC Worldcup women Meeting : पंतप्रधान मोदींनी आयसीसी महिला विश्वचषक ट्रॉफीला हात लावला नाही, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक