मुंबई: बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाची जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील वरळी वाहतूक विभागाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा संदेश पाठवला आहे. या मेसेजमध्ये सलमानच्या गाडीला बॉम्बस्फोट करून उडवून देण्याचं आणि थेट त्याच्या घरात घुसून त्याची हत्या करण्याचं वर्णन करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशीला वेग आला आहे.
सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून काळवीट प्रकरणामुळे चर्चेत आहे आणि बिष्णोई टोळीच्या रडारवर असल्याचं वेळोवेळी समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भरदिवसा हत्या झाल्यानंतर, बॉलीवूडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं कारण बा सिद्दीकी आणि बॉलिवूड यांचे घनिष्ठ संबंध होते. या हत्येचं जबाबदारी बिष्णोई टोळीने घेतली होती. त्यानंतर सलमानसह शाहरुख खान यांनाही अशाच प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे.
हेही वाचा: PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक
सध्या सलमान खान कुठेही जाताना मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात आणि खासगी सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीतच दिसतो. वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीत बुलेटप्रुफ काच बसवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या नव्या धमकीने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, त्याच्या गाडीवर बॉम्ब हल्ल्याचा आणि घरात घुसून हत्या करण्याचा इशारा दिला गेल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिस तपास सुरु असून, आरोपीचा माग काढण्यासाठी सायबर विभागही कार्यरत आहे.