Satish Shah Marathi Film Journey: हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा चेहरा ठरलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. उपचार सुरु असतानाही अचानक आलेल्या या बातमीने चाहत्यांना आणि सहकलाकारांना दुःखाचा धक्का दिला आहे.
सतीश शाह यांचा जन्म 25 जून 1951 रोजी झाला. 'साराभाई वर्सेस साराभाई', 'ये जो है जिंदगी', आणि 'मैं हूं ना' सारख्या सुपरहिट मालिकांमधून आणि चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा सहज, संवादप्रधान विनोद आणि चेहऱ्यावरील निरागसता प्रेक्षकांना कायम भावत आली. मात्र सतीश शाह यांची ओळख केवळ हिंदीपुरती मर्यादित नव्हती त्यांनी मराठी सिनेसृष्टीतही लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या.
हेही वाचा: Veteran Actor Satish Shah Passes Away: ज्येष्ठ अभिनेता सतीश शाह यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठीशी घट्ट नाळ
सतीश शाह यांना मराठी भाषा उत्तम बोलता येत असे. त्यामुळे मराठी सिनेमांमध्येही त्यांनी आपली छाप पाडली. त्यांच्या अभिनयात सहजता आणि वेळेवर दिलेला संवाद यामुळे त्यांच्या भूमिकांना नेहमीच खास ओळख मिळाली.
त्यांच्या कारकिर्दीतील दोन विशेष मराठी चित्रपट म्हणजे 'गंमत जंमत' आणि 'वाजवा रे वाजवा'. हे दोन्ही चित्रपट 80च्या दशकात प्रदर्शित झाले आणि आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
‘गंमत जंमत’ मधील इन्स्पेक्टर फुटाणे
‘गंमत जंमत’ या सुपरहिट कॉमेडी सिनेमात त्यांनी इन्स्पेक्टर फुटाणे ही विनोदी भूमिका साकारली होती. ही त्यांची मराठीतील पहिली झळक होती. चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर मुख्य भूमिकेत होते. सतीश शाह यांची भूमिका छोटी असली, तरी त्यांच्या विनोदी टायमिंगमुळे प्रेक्षकांना हसू आवरलं नाही.
‘वाजवा रे वाजवा’ मधील खलनायक बाबूलाल जैन
या चित्रपटात त्यांनी बाबूलाल जैन नावाचा प्रभावी खलनायक साकारला. अशोक सराफ यांच्या समोर सतीश शाह यांनी या भूमिकेला वेगळी ओळख दिली. त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास, आणि संवादातील सहज विनोद, यामुळे त्यांची ही भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे.
अभिनयाची अखंड साधना
सतीश शाह यांनी आपल्या कारकिर्दीत 200 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी केवळ विनोदी नव्हे, तर गंभीर भूमिकाही प्रभावीपणे साकारल्या. त्यांच्या अभिनयात बुद्धिमत्ता, साधेपणा आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम दिसतो.
वैयक्तिक आयुष्य
1982 साली त्यांनी फॅशन डिझायनर मधू शाह यांच्याशी लग्न केलं. दोघांनाही मुले नव्हती, पण त्यांनी एकमेकांना नेहमीच साथ दिली. सतीश शाह यांनी कधीच प्रसिद्धीच्या मागे धाव घेतली नाही. ते नेहमी म्हणायचे 'मी कामासाठी आलोय, प्रसिद्धीसाठी नाही.'
सतीश शाह यांच्या जाण्याने केवळ हिंदी नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीनेही एक उत्तम कलाकार गमावला आहे. त्यांचा सहज विनोद आणि कलाकृतींवरील निष्ठा येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.