Fraud Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना सध्या आर्थिक गुन्हे प्रकरणामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एका व्यावसायिकाने या जोडप्यावर 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप केला असून, मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीला देश सोडून जाण्याची परवानगी नाकारली आहे.
EOW ने बजावली नोटीस
आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध नोटीस बजावली असून, दोघेही तपास किंवा न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत. शिल्पा शेट्टीला YouTube कार्यक्रमासाठी कोलंबोला 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान जाण्याची आवश्यकता असल्याचे वकिलांनी सांगितले, मात्र न्यायालयाने हा अर्ज नाकारला. दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रथम फसवणुकीच्या आरोपांसाठी 60 कोटीची रक्कम द्या, त्यानंतरच प्रकरणाचा विचार केला जाईल.
हेही वाचा - Sameer Wankhede : 7 दिवसांत उत्तर द्या! समीर वानखेडे मानहानी प्रकरणी शाहरुख खानच्या कंपनीला उच्च न्यायालयाचे निर्देश
या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा यांचे अंदाजे पाच तासांचे जबाब आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदवले गेले. राज कुंद्रा यांनी या संदर्भात निवेदन जारी करत म्हटले की, 2016 मध्ये कंपनी लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतरही मी तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले आहे आणि सर्व मागितलेली कागदपत्रे प्रदान केली आहेत.
दरम्यान, व्यावसायिक दीपक कोठारी यांनी 2015 ते 2023 दरम्यान व्यवसाय विस्तारासाठी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 60.48 कोटीची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीशी संबंधित फसवणूक केल्याचा आरोप कोठारी यांनी केला आहे. या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे सार्वजनिक जीवन आणि व्यावसायिक प्रतिष्ठा दोन्हीवर परिणाम होत आहेत.