बॉलीवूडची सौंदर्यवती, अभिनयाची खाण आणि लाखो दिलाची धडकन असणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच छोट्या पडद्यावर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहेत. माधुरी दीक्षित कोण होणार करोडपती हा मराठी रिअॅलिटी शो होस्ट करणार असून नुकतेच त्याचे टीझर सोनी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम पेजवप शेअर करण्यात आले आहे. यात माधुरीचा हिरव्या साडीतला मनमोहक लुक प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. यावेळी जे कधीही घडलं नाही ते घडणार… महाराष्ट्राच्या घराघरांत चर्चा रंगणार… कारण आता खेळ बदलणार…!, अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. तसेच हा कार्यक्रम लवकरच सोनी मराठी वाहिनीवर येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. पण यावेळी या शोमध्ये मोठे बदल होणार असल्याचे समोर आले आहे. इतकी वर्ष या शोच्या सीझनचे सूत्रसंचानल अभिनेते सचिन खेडेकर करत होते. पण यावेळी मात्र पहिल्यांदाच एक अभिनेत्री या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे ही अभिनेत्री कोण असेल याची उत्सुकता निर्माण झाली होती. आता या गुलदस्त्यावरुन पडदा उठला आहे. या सीझनमध्ये महाराष्ट्राची लाडकी लेक आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.