Tejaswini Pandit: मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना, आता सिनेसृष्टीतील काही कलाकारही एक जागरूक नागरिक म्हणून मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची एक स्पष्ट आणि थेट भूमिका सध्या चर्चेत आली आहे.
तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर एक सडेतोड पोस्ट शेअर करत महापालिका निवडणुकीबाबत मतदारांना विचार करायला भाग पाडलं आहे. “निवडणूक म्हणजे फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर पुढील पाच वर्षांच्या शहराच्या भवितव्याचा निर्णय आहे,” असा ठाम संदेश तिने आपल्या पोस्टमधून दिला आहे. कोणत्याही पक्षाचं नाव न घेता तिने मतदारांना योग्य उमेदवार निवडण्याचं आवाहन केलं आहे.

तेजस्विनीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे की, आपल्या दैनंदिन आयुष्यात नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नगरसेवक थेट परिणाम करतात. त्यामुळे केवळ ओळख, दबाव किंवा आमिषांमुळे मत न देता, सुज्ञ, प्रामाणिक आणि काम करण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच मत द्या, असा सल्ला तिने दिला आहे. भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती महापालिका देऊ नका, असंही ती ठामपणे म्हणाली आहे.
तेजस्विनीची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी तिच्या स्पष्ट भूमिकेचं कौतुक केलं आहे. अनेक युजर्सनी “सेलिब्रिटी असूनही जबाबदार नागरिक म्हणून भूमिका मांडली” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मात्र तिच्या पोस्टवरून राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न केला असला, तरी तेजस्विनीने कोणत्याही पक्षाला थेट समर्थन किंवा विरोध केलेला नाही.
दरम्यान, या निवडणुकीत एक महत्त्वाचा बदल म्हणजे चार सदस्यीय प्रभाग रचना. याबाबतही अनेक मतदारांमध्ये संभ्रम आहे. अनेकांना वाटतं की एका उमेदवाराला मत दिलं की मतदान पूर्ण होतं. मात्र प्रत्यक्षात प्रत्येक मतदाराला आपल्या प्रभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा चारही जागांसाठी मतदान करणं आवश्यक आहे. ईव्हीएम मशीनवर चारही उमेदवारांसमोरचं बटण दाबल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही.
जर एखाद्या जागेवरील उमेदवार योग्य वाटत नसेल, तर त्या जागेसाठी ‘नोटा’चा पर्याय निवडता येतो. मात्र कोणताही पर्याय निवडणं अनिवार्य आहे. अन्यथा तुमचं मत तांत्रिक कारणामुळे अवैध ठरू शकतं. त्यामुळे मतदान करताना काळजीपूर्वक सर्व सूचना पाळाव्यात, असं आवाहन निवडणूक आयोगाकडूनही करण्यात आलं आहे.
तेजस्विनी पंडितची ही पोस्ट सध्या केवळ एक सोशल मीडिया पोस्ट न राहता, मतदार जागृतीचा एक महत्त्वाचा संदेश ठरत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य द्यावं, हाच तिच्या संदेशाचा गाभा आहे.