प्रसाद काथे
स्त्री-सन्मानाला केंद्रस्थानी ठेवून 'जपूया संस्कृती, विणूया नाती' या ब्रीदवाक्याला अनुसरून बृहन् महाराष्ट्र मंडळाचे (BMM) 22 वे चार दिवसांचे संमेलन BMM2026 सिॲटल येथे ऑगस्ट 6-9 मध्ये दिमाखात संपन्न झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छांनी आणि प्रमुख पाहुण्या लेफ्टिनेंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, सिॲटलमधील भारताचे कॉन्सुल जनरल प्रकाश गुप्ता, मिशिगनचे अमेरिकन खासदार ठाणेदार, BMM अध्यक्ष प्रसाद पानवळकर, संमेलनाचे मुख्य संयोजक मोहित चिटणीस ह्या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाची सुरुवात झाली. आपल्या संस्कृतीची ओळख व मुळांशी असलेले स्नेहबंध जपत, परदेशात स्थायिक मराठी बांधवांनी जागतिक नागरिक म्हणून आपली सकारात्मक प्रतिमा जोपासण्याविषयी डॉ. माधुरी कानिटकर आणि अविनाश धर्माधिकारी यांनी केलेले मार्गदर्शन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. त्याचबरोबर, उत्तर अमेरिकेतील कलाकारांनी सादर केलेले दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम हे यंदाच्या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले.
संमेलनातील उत्तर अमेरिकेतील कलाकारांची प्रतिभा आणि अप्रतिम सादरीकरणाला अजित भुरे, विजय केंकरे, प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे, डॉ. सलील कुलकर्णी, हृषीकेश रानडे, सुनंदन लेले, निलेश ओक आणि संजय उपाध्ये यांसारख्या दिग्गजांनी मनापासून दाद दिली. बालतरंग, किशोरकुंज, मस्तीची मधली सुट्टी, मोगरा फुलला, जावळीच्या दऱ्याखोऱ्यात, हसूबाई जोरात, वाद्यसंगम, फॅमिली जॅम, निसर्ग माऊली, संगीत शारदा, भाईगिरी, एल डोराडो-कथ्थक बॅले, गोंद्या आला रे, बहुरंगी, सावित्रीच्या लेकी, मराठी तितुका मेळवावा, नाट्यस्वर – मानापमान ते कट्यार, तीर्थ विठ्ठल, संगीत अवघा रंग एकचि झाला, आठवणीतली पैठणी, सुखी माणसाचा सदरा, रेडिओ मैत्री 90.5 एफएम – एक सुरमयी रेडिओ सफर, महानिर्वाण, आठवणी… On Air अशा विविध कार्यक्रमांमधून बालकलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्वांनी आपल्या कलागुणांची अप्रतिम झलक सादर केली. या कलाकारांसह पडद्यामागे अथक परिश्रम घेणाऱ्या स्वयंसेवकांच्या जिद्दीचे आणि योगदानाचेही प्रेक्षक तसेच विशेष अतिथींनी मनापासून कौतुक केले.
मनोरंजनापलीकडे जाऊन मौलिक विचारांची देवाणघेवाण घडवून आणणारी ‘गीतेचा सर्वार्थाने उपदेश नक्की कोणता?’, ‘कर्करोग: समज, गैरसमज आणि प्रतिबंधक उपाय’, ‘सुखाचा शोध, वेध आणि बोध’ यांसारखी व्याख्याने, संवाद : अमेरिकेतील मराठी आमदार संतोष साळवी आणि महापौर हेमंत मराठे, तसेच चित्रकार प्रमोद कुर्लेकर आणि सुचित्रा भोसले यांचा ‘चित्रकारांचा प्रवास’ यांसारखे कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. बी-कनेक्ट, रिअल इस्टेट कॉन्फरन्स, CME कॉन्फरेन्स, प्रदर्शन आणि विक्री हे देखील मराठी व्यावसायिकांना मोठ्या संख्येने एकत्र आणणारे उपक्रम ठरले.
नाट्यसृजन एकांकिका, तालश्रेष्ठ वादनोत्सव, रंग महाराष्ट्राचे आणि स्वरमंच अशा विविध स्पर्धांमधून उत्तर अमेरिकेतील गुणवंत कलाकारांना आपल्या कलागुणांना प्रतिष्ठित मंचावर सादर करण्याची व संबंधित क्षेत्रातील दिग्गजांकडून गौरवास्पद पावती मिळवण्याची संधी मिळाली. उ. अमेरिकेतील अशा प्रतिभावान विजेत्यांचा आणि स्पर्धकांचा BMM ला अभिमान आहे.
'स्त्री सन्मान' या उपक्रमाद्वारे भारतातील आणि उत्तर अमेरिकेतील कर्तृत्ववान व प्रेरणादायी बारा महिलांचा गौरव करण्यात आला. तसेच, बदलत्या तंत्रज्ञानविश्वाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या उत्तर अमेरिकेतील चार नेतृत्वनिपुण महिलांना 'She Shapes AI' या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विवाहोत्सुक तरुणांच्या पालकांसाठी "रेशिमगाठी" या उपक्रमांतर्गत परिचय आणि सुसंवाद सत्राला उत्तम प्रतिसाद मिळाला. तर उत्तररंग ह्या उपक्रमांतर्गत जेष्ठांनी विविध रंजक कार्यक्रमांचा आनंद घेतला. 'गोफ' ही 168 पानी स्मरणिका संमेलनाच्या निमित्ताने सर्व उपस्थितांना वाटण्यात आली.
'साधू-संत येती घरा' उपक्रमाद्वारे सामाजिक सद्भावाची जाणिव ठेवून भारतातील विविध गरजू स्तरांसाठी हिरीरीने कार्य करणाऱ्या संस्थांना एका व्यासपीठावर आणले गेले. त्यांच्या प्रतिनिधींना उत्तर अमेरिकेतील मराठी गुणिजनांतर्फे सन्मान आणि निधी संकलनाच्या सातत्यपूर्ण नव्या वाटा खुल्या करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले गेले.
भारतातील लोकप्रिय नामवंत कलाकारांच्या भेटी आणि त्यांच्या कलाकृती हेही या संमेलनाचे खास आकर्षण ठरले. आरती अंकलीकर यांची शास्त्रीय संगीताची मैफिल संस्मरणीय ठरली. प्रशांत दामले, हृषीकेश रानडे आणि नेहा वर्मा यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून ‘भावांजली’ या कार्यक्रमाद्वारे दिग्गज पार्श्वगायकांच्या अजरामर सुरांना संगीतमय मानवंदना दिली. तर शुभंकर कुलकर्णी यांचा ‘लख लख चंदेरी A Candle Light Concert’ हा कार्यक्रम तरुणाईच्या विशेष पसंतीस उतरला. सत्यजित प्रभू, अमर ओक, निलेश परब, रितेश ओहोळ आणि प्रसाद पाध्ये यांच्या वाद्यवृंदाची सुरेल साथ या कार्यक्रमांची रंगत वाढवणारी ठरली.
‘ऑल दि बेस्ट’ हे सदाबहार विनोदी नाटक, ‘द फोक आख्यान’ हा लोककलेचा भव्य आविष्कार आणि या संमेलनासाठी विशेष सादर केलेला प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांचा ‘नाटकामागचे नाटक’ हे कार्यक्रम रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले. या भव्य मराठी सांस्कृतिक अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी बृहन् महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवळकर आणि संमेलनाचे संयोजक मोहित चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून शेकडो स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
पुढील पर्वाकडे…
सिॲटलमध्ये अनुभवलेला हा चार दिवसांचा उत्सव आता आठवणींच्या रूपाने मनात राहणार असला, तरी BMM ची ही वाटचाल थांबणारी नाही. ‘जपूया संस्कृती, विणूया नाती’ हा धागा पुढे नेत BMM2028 चे आगामी संमेलन अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे रंगणार आहे. सिॲटलने दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक अनुभवांची शिदोरी घेऊन आता पुढील पर्वाची तयारी BMM2028 संमेलनाचे अध्यक्ष अमोल फुलांबरकर आणि विद्यमान BMM अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. नवे शहर, नवी स्वप्ने आणि नव्या पिढीला जोडणारी तीच मराठी अस्मिता घेऊन BMM2028 मध्ये पुन्हा एकदा जगभरातील मराठी मनांना एकत्र आणण्यासाठी नव्या स्वयंसेवकांचा उत्साह आणि उमेद आतापासूनच दिसून येत आहे.