Marathi Artists Emotional Reaction on Sad Demise of Asha Bhosle : भारतीय संगीत क्षेत्रातील एक अढळ ध्रुवतारा निखळल्याची भावना व्यक्त करत संपूर्ण कलाविश्व आज शोकसागरात बुडाले आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काल प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशाताईंचे पार्थिव उद्या लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या असून, "तुमच्यासारखा कलाकार ना कधी झाला, ना कधी होईल," अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
अशोक सराफ यांनी जागवल्या रेकॉर्डिंगच्या आठवणी
अभिनेते अशोक सराफ यांनी आशाताईंसोबतचा एक अविस्मरणीय प्रसंग सांगत त्यांना मानवंदना दिली. "त्यांचा आवाज म्हणजे पुन्हा न होणे," असे म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'तमाशा' चित्रपटातील एका लावणीच्या रेकॉर्डिंगवेळी आशाताईंनी अशोक सराफ यांना एका संवादासाठी आग्रह केला होता. त्यांना 'काय' हा शब्द रेकॉर्डिंगमध्ये बोलायला सांगितला. त्या महान गायिकेसोबत माइकसमोर उभे राहताना आपण खूप घाबरलो होतो, अशी कबुली सराफ यांनी दिली. त्यांच्या मनात आशाताईंबद्दल आदरयुक्त भीती होती. अशोक सराफ यांनी सांगितले की, ते केवळ आशाताईंचे चाहते नव्हते, तर आशाताईंना देखील सराफ यांचा अभिनय आवडायचा, ही त्यांच्यासाठी मोठी पावती होती.
संगीतकारांची भावुक श्रद्धांजली
प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी "संगीताची आशा माळवली" अशा मोजक्या पण काळजाला भिडणाऱ्या शब्दांत आपली पोस्ट शेअर केली. तर संगीतकार सलील कुलकर्णी यांनी अत्यंत भावुक पोस्ट लिहिली आहे. कुलकर्णी यांच्या मते, आशाताई केवळ एक आवाज नव्हत्या, तर त्या घरातील लहानांपासून आजीपर्यंत सर्वांच्या भावना व्यक्त करणारा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होत्या. "आता आकाशात चंद्र तसाच उगवेल का आणि चांदणे तसेच बरसेल का?" असा प्रश्न विचारत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.
हेही वाचा – Asha Bhosle : 'हे' गाणं गायची आशाताईंची इच्छा राहिली अपुरी! 92 व्या वर्षी संगीत सम्राज्ञीचा प्रवास थांबला
महेश कोठारे यांनी व्यक्त केली हळहळ
चित्रपट निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांनीही आशाताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याचे म्हटले आहे. 'जीवलगा' चित्रपटाचा उल्लेख करत कोठारे म्हणाले की, त्या चित्रपटातील एका गाण्यासाठी त्यांनी आशाताईंचाच आवाज हवा होता, यासाठी विशेष प्रतीक्षा केली होती. त्यांच्या गायनाने अनेक चित्रपट अजरामर झाले असून, आता केवळ त्यांच्या आठवणी आणि त्यांचे गाणेच सोबत राहील, अशा शब्दांत कोठारे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अंत्यदर्शन आणि निरोप
गेल्या 8 दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या या महान गायिकेचा प्रवास आज थांबला आहे. उद्या लोअर परळ येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल, जिथे चाहते आणि कलाकार त्यांना अखेरचा निरोप देतील. साहित्यापासून संगीतापर्यंत आणि अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत सर्वच क्षेत्रांतील लोकांनी "महाराष्ट्राचा सूर हरपला" असल्याची भावना व्यक्त केली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची ही एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे.