मुंबई : सिनेसृष्टीत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ विविध भूमिका साकारणारे तसेच महाभारत मालिकेतून कर्णाच्या व्यक्तिरेखेनं घराघरात पोहोचणारे ज्येष्ठ कलाकार पंकज धीर यांचे आज, बुधवारी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाच्या आजाराचा सामना करत होते. अखेर त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली असून आज त्यांची प्राणज्योत मावळली. याबाबत अर्जुनची भूमिका साकारणारे त्यांचे महाभारतातील सहकलाकार अभिनेता फिरोज खान यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.
हेही वाचा : Javed Akhtar : 'माझी मान शरमेनं झुकली'; तालिबानी मंत्र्याच्या भारतातील आदरातिथ्यावर जावेद अख्तर यांनी व्यक्त केली नाराजी
छोट्या पडद्यावर 90 च्या दशकात बी. आर. चोपडा यांची महाभारत ही मालिका लोकप्रिय झाली होती. यात अभिनेते पंकज धीर यांनी कर्णाची भूमिका साकारली होती. त्या व्यतिरिक्त अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. पंकज धीर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांमधून केली. त्यांचा पहिला चित्रपट 'पूनम' (1981) होता. परंतु तो चित्रपट प्रचंड अपयशी ठरला. पुढील काही वर्षांत त्यांनी 'सूखा', 'मेरा सुहाग', 'रणदम वरवू' आणि 'जीवन एक संघर्ष' यासारख्या इतर अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले. तथापि, 1988 मध्ये बीआर चोप्रांच्या 'महाभारत' या चित्रपटातून पंकज यांना यश मिळाले.