दुबई: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे दुबईत परतल्यानंतर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने संयुक्त अरब अमिरातीच्या तृत्वाचे आभार व्यक्त केले आहेत. या कठीण काळात देशातील प्रशासनाने शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्याने कौतुक केले. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या संपूर्ण अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विवेक ओबेरॉय म्हणाला की, यूएई त्यांच्यासाठी केवळ कामाचे ठिकाण नसून दुसरे घरच आहे. त्याच्या मते, या देशात 200 हून अधिक देशांतील लोक एकत्र राहतात आणि प्रत्येकासाठी ही जागा समान संधी देणारे घरासारखे वातावरण निर्माण करते. गेल्या काही दिवसांत पश्चिम आशियात तणाव वाढत असताना कुटुंबापासून दूर राहण्याची भावना त्यांना सतत अस्वस्थ करत होती, असेही त्याने सांगितले.
दुबईकडे परतताना विमानातील अनुभवही त्याने भावनिक शब्दांत मांडला. त्याच्या मते, त्या फ्लाइटमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांत वेगवेगळ्या भावना आणि चिंता दिसत होत्या. प्रवासादरम्यान स्वतःच्या मनातही अस्वस्थता होती, कारण त्यांचे विचार सतत कुटुंबाकडे आणि विशेषतः मुलांकडे वळत होते. अनिश्चिततेच्या वातावरणात सुरक्षितपणे कुटुंबाला भेटण्याचीच एकच इच्छा मनात असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिस्थितीत मजबूत आणि संयमी नेतृत्व किती महत्त्वाचे असते, याचाही त्याने उल्लेख केला आहे. विवेक ओबेरॉयच्या मते, यूएईच्या नेतृत्वाने संकटाच्या काळात शांतता, संयम आणि दृढतेचे उदाहरण घालून दिले आहे. देशातील प्रशासनाने नागरिक आणि परदेशी रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्यामुळे लोकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
व्हिडिओमध्ये त्याने एक भारतीय म्हणूनही त्याची भावना व्यक्त केली आहे. यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या वतीने तेथील नेतृत्वाचे आभार मानले. त्यांच्या मते, यूएईने नेहमी भारतीयांना आपलेपण दिले आहे आणि त्यांना कधीही परके मानले नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील लोकांमध्ये विश्वासाचे आणि सहकार्याचे मजबूत नाते निर्माण झाले आहे.
दरम्यान, आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विवेक ओबेरॉय याने यूएईच्या नेतृत्वासोबतच तेथील फ्रंटलाइन वर्कर्स आणि एमिरेट्स एअरलाईन्सचेही आभार मानले. सुरक्षितपणे दुबईत परतल्यामुळे दिलासा मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. संकटाच्या काळात मानवी संवेदना, नेतृत्व आणि परस्पर सहकार्य किती महत्त्वाचे असते, याची आठवण या अनुभवाने करून दिल्याचेही विवेक ओबेरॉयने नमूद केले आहे.