कॅलिफोर्निया: 'जगाच्या पाठीवर अशक्य असे काहीच नाही' या उक्तीला सार्थ ठरवणारे इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कारण ठरले आहे ‘स्टारलिंक स्मार्टफोन’च्या चर्चेचे. गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञान विश्वात “स्टारलिंक स्वतःचा फोन लाँच करणार” अशा बातम्यांचा महापूर आला होता. मात्र, मस्क यांनी स्वतः सोशल मीडियावर स्पष्ट करत सध्या तरी कोणताही स्मार्टफोन विकसित करत नसल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
तंत्रज्ञानाची नवी झेप: डायरेक्ट-टू-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी
स्वतःचा फोन नसला तरी SpaceX मार्फत मस्क एक वेगळ्याच पातळीवरील तंत्रज्ञान विकसित करत आहेत. Starlink आता केवळ डिश अँटेना वापरणाऱ्या ब्रॉडबँडपुरते मर्यादित न राहता थेट मोबाईलपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याच्या तयारीत आहे. यालाच ‘Direct-to-Device (D2D)’ तंत्रज्ञान म्हटले जाते. सध्या हजारो सॅटेलाईट कक्षेत कार्यरत असून त्यातील शेकडो सॅटेलाईट मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी सुसज्ज करण्यात आले आहेत. भविष्यात कोणत्याही अतिरिक्त हार्डवेअरशिवाय सामान्य स्मार्टफोनवर सॅटेलाईट इंटरनेट उपलब्ध होऊ शकते.
हेही वाचा: India Russia Relations: चीनला स्वस्त तेल, भारताला 'नो एंट्री'? अमेरिकेच्या धोरणामुळे पुतिन यांनी फिरवली भारताकडे पाठ?
मोबाईल कंपन्यांशी हातमिळवणी
स्वतःचा हँडसेट बाजारात आणण्याऐवजी स्टारलिंक विद्यमान टेलिकॉम कंपन्यांशी भागीदारी करत आहे. उदाहरणार्थ, T-Mobile सोबतची भागीदारी ही त्याच दिशेने उचललेले पाऊल आहे. या सहकार्यामुळे दुर्गम भागात जिथे मोबाईल टॉवर उभारणे कठीण आहे, तेथेही नेटवर्क उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी भविष्यात Starship रॉकेटच्या माध्यमातून अधिक क्षमतेचे सॅटेलाईट अवकाशात पाठवण्याची तयारी सुरू आहे.
मस्क यांच्या मते, जर कधी त्यांनी फोन तयार केला, तर तो पारंपरिक आयफोन किंवा अँड्रॉइडसारखा नसेल. तो एआय आणि न्यूरल नेटवर्क्ससाठी अनुकूल ‘एज नोड’ स्वरूपाचे वेगळेच डिव्हाइस असेल.
गुंतवणूकदारांचे लक्ष आणि IPO चर्चा
स्टारलिंकचा विस्तार हा केवळ तांत्रिक नव्हे तर मोठा व्यावसायिक डाव आहे. सॅटेलाईट-आधारित डायरेक्ट-टू-डिव्हाइस इंटरनेट मार्केट येत्या काही वर्षांत अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे. या संभाव्य महसुलामुळे मस्क यांच्या मंगळ मोहिमेला आर्थिक पाठबळ मिळू शकते. याच पार्श्वभूमीवर स्पेसएक्सच्या संभाव्य IPO बाबत अर्थ बाजारात चर्चा रंगत आहे.
सत्य की स्वप्न?
सध्या तरी ‘स्टारलिंक फोन’ ही अफवा आहे, प्रत्यक्ष उत्पादन नाही. मात्र मस्क यांची कार्यशैली पाहता भविष्यात सॅटेलाईट इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते, यात शंका नाही. ग्राहकांसाठी सध्या मुख्य लक्ष हे प्रगत सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीवर असावे नवीन फोनच्या प्रतीक्षेपेक्षा इंटरनेटच्या नव्या युगाची तयारी अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा: Murlidhar Mohol: अजित पवारांच्या विमानासोबत शेवटच्या क्षणी नक्की काय घडलं? केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली मोठी अपडेट