धारवाड: केंद्रीय अर्थमंत्री मिर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारतात डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर तब्बल 87 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो जागतिक सरासरीपेक्षा (60%) जास्त आहे. आयआयटी धारवाड येथे 'धरती बायोनेस्ट इक्युबेशन सेंटर'च्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अर्थमंत्री मिर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा: EPFO News : ईपीएफओचा मोठा निर्णय! सदस्यांसाठी पैसे काढण्याचे नियम झाले अधिक सोपे
निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली की, 'ही फिनटेक क्रांतिची पातळी दर्शवते. भारत देश हा जगात डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात अग्रगण्य ठरला आहे'. देशातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे या यशाचे प्रमुख कारण ठरले असून, 2024-2025 या आर्थिक वर्षांत तब्बल 261 ट्रिलियन रुपयांचे 18 हजार 580 कोटी व्यवहार यामार्फत झाले आहेत.
पुढे सीतारामन म्हणाल्या की, 'आधार, युपीआय आणि डिजीलॉकर यांसारख्या मजबूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे लाखो लोक औपचारिक वित्तीय व्यवस्थेत आले आहेत. डिजिटल पेमेंट आता फक्त शहरांपुरते मर्यादित राहिले नाही, तर टायर-2 आणि टायर-3 शहरांमध्येही वेगाने लोकप्रिय होत आहे'. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान कर्नाटक दौरा असून, या दौऱ्यात ग्रामीण विकास, कृषी प्रक्रिया, उद्योजकता आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यावर भर देण्यात आला आहे. या दौऱ्यात निर्मला सीतारामन विविध शेतकरी प्रशिक्षण केंद्रे, कृषी प्रक्रिया केंद्रे आणि ग्रामीण उद्योग युनिट्सचे उद्घाटन करतील. तसेच, विद्यार्थ्यांना आणि तरुण उद्योजकांना नवोपक्रम आणि जैवतंत्रज्ञानातील संधीचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहन करतील. यादरम्यान, सीतारामन यांनी सांगितले की, 'फिनटेक ही फक्त तंत्रज्ञानाची बाब नाही, तर ती आर्थिक सक्षमीकरणाचे साधन आहे'.