Retail Inflation: केंद्र सरकारने मे महिन्याची महागाईची अधिकृत आकडेवारी जाहीर केली असून, यामध्ये सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यातील 3.48 टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यात देशांतर्गत किरकोळ महागाई वाढून थेट 3.93 टक्क्यांवर पोहोचली आहे. चालू वर्षातील महागाईतील ही सर्वात मोठी मासिक वाढ ठरली आहे. जानेवारी महिन्यात हाच दर 2.74 टक्के इतका होता, जो आता पाच महिन्यांत सातत्याने वाढत गेला आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा आणि भू-राजकीय तणावाचा थेट फटका आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर बसू लागल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
अन्नपदार्थांच्या किमती भडकल्या; ग्रामीण भागाला अधिक फटका
किरकोळ महागाई वाढण्यामागे अन्नपदार्थांच्या वाढत्या किमती हेच सर्वात मुख्य कारण ठरले आहे. एप्रिलमधील 4.2 टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यात ग्राहकांसाठीची अन्नधान्य महागाई 4.78 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे, महागाईचा हा फटका शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाला अधिक बसला आहे. ग्रामीण भागातील अन्नधान्य महागाईचा दर 4.85 टक्के नोंदवला गेला आहे, तर शहरी भागात हाच दर 4.66 टक्के इतका होता. टोमॅटो, आले आणि इतर पालेभाज्यांसारख्या नाशवंत वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याने बाजारावर हा दबाव निर्माण झाला आहे.
ऑक्टोबरमध्ये व्याजदर वाढीचे संकेत; मान्सूनवर सर्वांचे लक्ष
एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यातील महागाईच्या दरात 0.75 टक्के अंकांची वाढ झाली आहे. यावर कोटक महिंद्रा बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज यांनी सांगितले की, "सध्या किरकोळ महागाईचा दर 4 टक्क्यांच्या खाली असणे आणि 'कोअर इन्फ्लेशन'ची (मूलभूत महागाई) आकडेवारी स्थिर राहणे हा तात्पुरता दिलासा आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असून रुपया घसरण्यापासून रोखण्यात यश आले आहे. मात्र, आगामी काळात अन्नधान्य महागाई कशी राहील, हे संपूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असेल." सध्याची परिस्थिती पाहता ऑक्टोबर महिन्यात व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पुढील सहा महिन्यांत महागाई 6 टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची भीती
दरम्यान, ब्रिकवर्क रेटिंग्जचे राजीव सरन यांच्या मते, मे महिन्यातील ही आकडेवारी बाजाराच्या अपेक्षेनुसारच आहे. सध्या 'कोअर इन्फ्लेशन' 3.7 टक्क्यांच्या आसपास स्थिर राहिले असले तरी अन्नधान्य महागाई हाच मुख्य चिंतेचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि हवामान क्षेत्रातील 'एल निनो'चा संभाव्य धोका यामुळे देशांतर्गत आर्थिक जोखीम वाढली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाल्यास अन्नपदार्थांचे भाव अधिक भडकतील. आनंद राठी समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सुजन हाजरा यांनी सावध केले आहे की, या आव्हानात्मक परिस्थितीमुळे पुढील सहा महिन्यांत किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या वर जाण्याची दाट शक्यता आहे.