दुःखाच्या अथांग सागरातही मानवतेचा दीप कसा प्रज्वलित राहतो, याचा जिवंत प्रत्यय केरळमध्ये आला. 10 महिन्यांची अॅलिन शेरिन अब्राहम, देशातील सर्वात लहान अवयवदाता ठरली आहे. अॅलिनला रविवारी शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तिच्या पालकांचा निर्णय “करुणेचा ऐतिहासिक आणि असामान्य आदर्श” असल्याचे गौरवोद्गार काढले, तर अभिनेते कमल हासन यांनी भावनिक संदेश देत, “ती आता पाच जणांच्या आयुष्यातून पुढे जगेल,” असे नमूद केले.
पथनमथिट्टा जिल्ह्यातील चर्चबाहेर पोलिसांनी औपचारिक मानवंदना देत अंत्यसंस्कार पार पाडले. या वेळी केरलच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज तसेच केंद्रीय मंत्री सुरेश गोपी उपस्थित होते. शोकाकुल नातेवाईक आणि शेकडो नागरिक अश्रूंना वाट मोकळी करून देत या लहान देवदूताला अखेरचा निरोप देत होते.
Salute you, Arun Abraham and Sherin Ann John. Our baby, Alin Sherin Abraham, lived for months within her mother, and ten months embraced by her parents’ boundless love. Now, she will help five other babies live better lives. By mindset and by heart, you are – and will always… pic.twitter.com/iXZvlgJqPv — Kamal Haasan (@ikamalhaasan) February 15, 2026
5 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या भीषण रस्ता अपघातात अॅलिन गंभीर जखमी झाली होती. आई आणि आजी आजोबांसह प्रवास करत असताना समोरून आलेल्या कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला कोची येथे हलविण्यात आले; मात्र 12 फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी तिला मेंदूमृत घोषित केले. “दुःखातही दान करणं श्रेष्ठ” या उक्तीला साजेसा, असीम वेदनेच्या त्या क्षणी सुद्धा तिच्या पालकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
या अपघाती घटनेनंतर आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि प्रशासनाने विलक्षण वेगाने काम करत ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला. नागरी उड्डाण नियमांमुळे रात्री हेलिकॉप्टरने वाहतूक शक्य नसल्याने, कोची ते तिरुवनंतपुरम हे सुमारे 230 किलोमीटर अंतर रुग्णवाहिकेद्वारे अवघ्या तीन तास 20 मिनिटांत पार करण्यात आले. कडक वाहतूक निर्बंध आणि मानवी सिग्नल व्यवस्थेमुळे हा प्रवास यशस्वी ठरला.
अॅलिनचे यकृत, मूत्रपिंड आणि हृदयाच्या झडपा यांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यकृत एका सहा महिन्यांच्या बालकाला देण्यात आले, तर मूत्रपिंड सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील 10 वर्षांच्या मुलाला प्रत्यारोपित करण्यात आले. हृदयाची झडप तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील रुग्णालयात बसविण्यात आली, तर नेत्रदान खासगी रुग्णालयाच्या नेत्रपेढीत करण्यात आले.
राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी या निर्णयाने मी “हेलावून गेलो” असल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार राष्ट्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहिल्याचे सुरेश गोपी यांनी सांगितले. या एका निर्णयाने केवळ पाच जणांना नवजीवन दिले नाही, तर संपूर्ण समाजाला करुणा आणि धैर्याचा नवा अर्थ शिकवला आहे. अॅलिन आता स्मृतीतच नव्हे, तर पाच हृदयांच्या ठोक्यांतून जिवंत राहणार आहे.