नवी दिल्ली : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. बंगळुरू चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी निखिल सोसाळे आणि सुनील मॅथ्यू यांच्यासह चौघे अटकेत आहेत.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह 4 जणांना अटक केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 18 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यामुळे या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं बंगळुरूमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र, यावेळी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली आणि या कार्यक्रमाला गालबोट लागलं. या विजयी परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी 11 जणांचा मृत्यू झाला. तर 47 जण जखमी झाले. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ‘रायल चॅलेंज बंगळूरु’(आरसीबी), कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) संस्था आणि ‘कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन’च्या (केएससीए) प्रतिनिधींच्या अटकेचे निर्देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते.
हेही वाचा: Chenab railway bridge Inauguration: मोदींच्या हस्ते चिनाब पूलाचे उद्घाटन
चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी कर्नाटक सरकारने शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरसीबी व्यवस्थापनाचे निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएचे सुनील मॅथ्यू यांच्यासह आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाने या चेंगराचेंगरीच्या घटनेची स्वतःहून दखल घेत राज्य सरकारला 10 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.